चिकनमुळे ‘कोरोना’ सिद्ध करा, पाच कोटी मिळवा..! 

‘‘आम्ही गेल्या दोन आठवड्यांपासून ग्राहकांमध्ये चिकन आणि अंडी कशी सुरक्षित आहेत, याची विविध माध्यमांतून जागरूकता करत आहोत. पण लोकांना पैशाची भाषा लगेच कळते. त्यामुळे आम्ही ‘चिकन खाण्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होते हे सिद्ध करा आणि पाच कोटी मिळवा’ अशीच थेट जाहिरात केली आहे. याचा जागरूकतेसाठी चांगला परिणाम दिसून येत आहे. - विजय मोरे, मुख्य कार्यकारी संचालक, अमीर चिकन, पुणे
poultry
poultry

पुणे : केवळ अफवांचा बाजार उठल्याने चिकन आणि अंडी उद्योगावर ‘नभूतो’ परिणाम होत आहे. कोरोनो विषाणूचा संसर्ग चिकन किंवा अंडी खाण्यामुळे होत नसल्याचे शास्त्रज्ञ, पोल्ट्री उद्योगासह, विविध क्षेत्रांतील मान्यवरांपासून राज्य सरकारने स्पष्ट केले, मात्र तरीही नुकसान थांबले नाही. अखेर पुण्यातील ‘अमीर चिकन’ या विक्री साखळी असलेल्या ब्रॅण्डने ‘चिकनमुळे कोरोना होतो, हे सिद्ध करा आणि पाच कोटी मिळावा’ अशी आव्हानात्मक जाहिरात करून ग्राहकांमध्ये जनजागृती सुरू केल्याने राज्यात ती जाहितरात प्रचंड चर्चेत आली आहे. 

एखादी चुकीची माहिती एका व्यक्तीपासून ते उद्योगापर्यंत किती नुकसान करू शकते, याचे ताजे उदाहरण म्हणजे पोल्ट्री उद्योग ! राज्यात पूरक व्यवसायात दुधानंतरचा दुसरा सर्वांत मोठा कुकुटपालन व्यवसाय आहे. केवळ शेतकऱ्यांसाठी तो पूरक व्यवसाय नाही, तर लाखो लोकांना रोजगार, मध्यस्थांना व्यवसाय देणारा आणि देशातील जनतेला प्रथिनांचे स्त्रोत पुरविणारा पोल्ट्री उद्योग हा महत्वाचा घटक आहे.  गेल्या दोन आठवड्यांपासून मात्र, लोकांमध्ये चिकन, अंडी खाण्याबद्दल अफवा उठल्याने पोल्ट्री उद्योगाचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत बोलताना ‘चिकन’चे मुख्य कार्यकारी संचालक विजय मोरे म्हणाले, की आपल्याकडे शास्त्रशुद्ध पद्धतीनेच कोंबडीपालन केले जाते. योग्य व्यवस्थापन ठेवले जाते. सध्याच्या काळात कोंबड्यांचे आरोग्य चांगले असते. आपल्या भारतीय आहार पद्धतीमध्ये चिकन हे चांगल्या पद्धतीने शिजवून आणि मसाल्यांचा वापर करूनच खाल्ले जाते. उलट चिकन आणि अंडी हे आरोग्यदायी घटकांचे चांगला स्रोत आहे. 

मोरे म्हणाले, की कोरोना व्हायरसच्या भीतीचा परिणाम चिकन आणि अंडी विक्रीवर झाला आहे. हा व्यवसाय सावरणे आणि ग्राहकांना शास्त्रीय पद्धतीने सत्यता पटवून देण्यासाठी आम्ही उत्पादकांनी ग्राहकांच्यामध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. नुसता ‘अमीर चिकन’चा विचार केला, तर पुणे जिल्ह्यातील आमच्या दुकानातून रोज किमान ७० हजार ग्राहक चिकन आणि अंड्यांची खरेदी करतात. त्यावर काहीसा परिणाम झाला आहे. जाहिरात, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना चिकन, अंडी खाण्याचे फायदे समजावून देत आहोत. तसेच त्यापासून मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही याचे शास्त्रीय दाखले देत आहोत. राज्याचे पशुसंवर्धन खाते, पशू तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी देखील कोरोना व्हायरसचा प्रसार आणि चिकन खाण्याचा काहीही संबंध नसल्याचे शास्त्रीय दाखले देऊन स्पष्ट केले आहे. त्यांचे आवाहन आणि शास्त्रीय पुरावे नागरिकांच्यापर्यंत पोचवीत आहोत. 

मोरे म्हणाले, ‘‘अजून एक वेगळा प्रयत्न म्हणून आम्ही ‘चिकन खाण्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होते हे सिद्ध करा आणि पाच कोटी मिळवा‘ अशीच थेट जाहिरात केली आहे. त्यात संपर्क क्रमांकही दिला आहे. यावर बरेच ग्राहक संपर्क साधून शंका निरसन करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार हा चिकन, अंडी खाण्यातून होत नाही याचे शास्त्रीय पुरावे आहेत. त्यामुळे कोणीही चुकीचा दावा करून पोल्ट्री उद्योगाला आणखी अडचणीत आणू नये, एवढीच आमची अपेक्षा आहे. या व्यवसायात थांबून चालत नाही. तेव्हा ग्राहकांनी शास्त्रीय बाजू लक्षात घ्यावी. चिकन, अंडी खाण्यामुळे आरोग्याला कोणताही धोका नाही. ग्राहकांच्या खरेदीवर अवलंबून असणारा हा व्यवसाय तातडीने सावरण्याची गरज आहे.’’ 

पुणे जिल्ह्याचे नुकसान ५०० कोटींच्या पुढे...  आर्थिक नुकसानीबाबत विजय मोरे म्हणाले की, राज्याचा विचार केला तर पुणे जिल्हा हा चिकन आणि अंडी उत्पादनात आघाडीवर आहे. केवळ अफवेमुळे गेल्या दीड महिन्यात पुणे जिल्ह्यातील पोल्ट्री उद्योगाचे सुमारे ५०० कोटी रुपयांहून जास्त नुकसान झाले आहे. होळीच्या दिवशी आम्ही पुणे जिल्ह्यात आर्थिक नुकसान सोसून ९० रुपयांनी कोंबडी विकली. सध्या आम्हाला एका कोंबडीमागे ६० ते ९० रुपयांचे नुकसान आहे. गेल्या महिनाभराचा विचार करता छोट्या पोल्ट्रीधारकाचे किमान पाच लाखांच्या पुढे, तर मोठ्या पोल्ट्रीधारकाचे नुकसान १२ कोटींच्या पुढे गेले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com