शेतकऱ्यांना देणार दुग्धजन्य पदार्थनिर्मितीचे प्रशिक्षण

दूध उत्पादक शेतकऱ्यांना व्यावसायिक अंगाने दुग्धजन्य पदार्थनिर्मितीचे प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च करून प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे.
To provide dairy products training to farmers
To provide dairy products training to farmers

पुणेः राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना व्यावसायिक अंगाने दुग्धजन्य पदार्थनिर्मितीचे प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च करून प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे.

‘‘राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वांत मोठा जोडधंदा म्हणून दुग्ध क्षेत्राचा विस्तार होतो आहे. मात्र सध्या फक्त दूध उत्पादित करणे व खासगी किंवा सहकारी दूध प्रकल्पांना पुरविणे, अशी मर्यादित भूमिका शेतकऱ्यांची ठेवली गेली आहे. शेतकऱ्यांना दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीबाबत वर्षांनुवर्षे काहीही सांगण्यात आले नाही. त्यामुळे या क्षेत्रात शेतकऱ्यांची मोठी पीछेहाट झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाचे प्रशिक्षण केंद्र भविष्यात मोलाची भूमिका बजावेल,’’ अशी माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली.

शेतकऱ्यांना दूध उत्पादनात आणल्यानंतर १५ दिवसांनी हमखास आर्थिक स्रोत उपलब्ध होतो. मात्र त्यामधून मिळणारा नफा मर्यादित आहे. या उलट शेतकऱ्यांना जर दुधावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण दिल्यास चित्र पालटू शकते. प्रक्रिया युक्त पदार्थांच्या विक्रीतून शेतकऱ्याला ३० ते ५० टक्क्यांपर्यंत जादा नफा मिळू शकतो. मात्र त्यासाठी  शेतकऱ्यांना अत्यावश्यक ठरणारे तांत्रिक प्रशिक्षण देण्याच्या सुविधा राज्यात तयार झालेल्या नाहीत.

‘‘कृषी विद्यापीठे किंवा दुग्धविकास खात्याने ही बाब लक्षात घेत राज्याच्या विविध विभागांमध्ये या पूर्वीच दुग्धजन्य प्रक्रिया पदार्थ निर्मितीची प्रशिक्षण केंद्रे उभारणे आवश्यक होते. मात्र ही चूक दुरुस्त करण्याचा पुढाकार राहुरी विद्यापीठापासून होत आहे. राज्याच्या दुग्धविकासासाठी ही बाब समाधान देणारी आहे,’’ असे मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.

पहिले केंद्र कोल्हापूरला उभारणार राज्याच्या दुग्धोत्पादनात नगर, पुणे व कोल्हापूर आघाडीवर आहे. हे तीनही जिल्हे राहुरी विद्यापीठाच्याच कार्यक्षेत्रात येतात. तेथे विशेष प्रशिक्षण केंद्रे उभारण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. यात पहिले केंद्र कोल्हापूरला उभे राहण्याची चिन्हे आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने विद्यापीठाच्या अखत्यारित असलेल्या कृषी विद्यालयाला विशेष निधी देखील मंजूर केला आहे. राज्य शासनाने निधी व मनुष्यबळ दिल्यास अन्य जिल्ह्यांत देखील केंद्रे उभी राहू शकतील, अशी माहिती एका शास्त्रज्ञाने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com