नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
अॅग्रो विशेष
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज द्या
शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे हा किसान क्रेडिट कार्डचा मुख्य हेतू आहे. मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांची मागणी असताना त्याचा लाभ मिळालेला नाही.
नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे हा किसान क्रेडिट कार्डचा मुख्य हेतू आहे. मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांची मागणी असताना त्याचा लाभ मिळालेला नाही. तसेच सध्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ३ लाखांवर जे ४ टक्के व्याज आकारले जात आहे ते माफ करून बिनव्याजी कर्ज द्यावे, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्राकडे केली आहे.
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारी (ता.१०) राज्यांतील कृषिमंत्री व संबंधित विभागाच्या महत्त्वाच्या घटकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यामध्ये मंत्री भुसे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी ही मागणी केली.
कृषिमंत्री भुसे म्हणाले, ‘‘बियाणे, खते खरेदी व शेतीसाठी लागणारे भांडवल किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येते. त्याचे वाटप वेळेवर झाले पाहिजे. सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला पतमर्यादा ठरवून दिली तर शेतकरी गरजेनुसार पैशाचा वापर करेल. तसेच वेळेवर भरणा करणे शक्य होईल. राज्यात आत्तापर्यंत किती किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले याची माहिती द्यावी.
‘‘२०१८ पासून सुरु झालेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत सध्या पाचव्या टप्प्यातील हप्ते दिले जात आहेत. मात्र अद्यापही अनेक शेतकरी वंचित आहेत. त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ द्यावा. जे लाभार्थी पात्र आहेत त्यांना योजना लागू झाल्यापासून फरक द्या,’’ अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या वेळी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अमलात आणलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजनेबाबत त्यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना माहिती दिली.
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष
देशात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेचे स्वागत आहे. मात्र जुन्या कंपन्या तसेच ज्या कंपन्या चांगले काम करत आहेत त्यांना पाठबळ द्या. कंपन्यांना आवश्यक वीज जोडण्या, मागणीनुसार पाणीपुरवठा व संबंधित परवानग्या द्याव्यात, प्राधान्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या कृषिमंत्री भुसे यांनी केल्या.