हळदीला द्या शिफारशीत खतमात्रा

पावसाच्या कालावधीत जमिनीतील ओलावा अभ्यासून पाणी देण्याचे नियोजन करावे. रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. माती परीक्षणानुसार विद्राव्य खतांचा वापर करावा.
provide recommended fertilizer dose to turmeric
provide recommended fertilizer dose to turmeric

पावसाच्या कालावधीत जमिनीतील ओलावा अभ्यासून पाणी देण्याचे नियोजन करावे. रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. माती परीक्षणानुसार विद्राव्य खतांचा वापर करावा. सध्या हळद लागवड होऊन ४० ते ४५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पिकाची उगवण पूर्ण होण्याचा हा कालावधी असतो. या वेळी वातावरणात ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमान असते. या अवस्थेमध्ये हळदीची उगवण पूर्ण होते, हळदीस एक किंवा दोन पाने येतात. पिकाच्या योग्य वाढीसाठी आंतरमशागतीची कामे वेळेवर करणे गरजेचे आहे. आंतरमशागतीच्या कामांमध्ये खते देणे, पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण इत्यादी महत्त्वाच्या कामांचा समावेश होतो. जर तापमान फारच कमी झाले तर हळद पिकांवर विविध कीड, रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. परिणामी गड्ड्यांची संख्या आणि आकार यावर रोगांचा परिणाम होत असतो. खतांचे व्यवस्थापन

  • पिकाला खतामधील सर्वच घटकांची कमी-अधिक प्रमाणात गरज असते. हळद पिकास हेक्‍टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश देण्याची शिफारस आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावयाचे असते. नत्र मात्र २ समान हप्त्यात विभागून द्यावे.
  • पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावयाचा असतो. नत्राचा दुसरा हप्ता भरणीच्या वेळी (लागवडीनंतर १०५ दिवसांनी) द्यावा.
  • सध्या ४५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असल्याने या वेळी हेक्‍टरी २१५ किलो युरिया आणि १२ किलो फेरस सल्फेट द्यावे.
  • फर्टिगेशन

  • जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा वापर केल्यास पिकाच्या गरजेनुसार खते देता येतात. माती परीक्षणानुसार विद्राव्य खतांचा वापर करावा.
  • एखाद्या अन्नद्रव्यांची मात्रा कमी जास्त झाली, तर त्याचा परिणाम लगेच पिकाच्या वाढीवर दिसतो. उदाहरणार्थ- हळदीला नत्र घटक जास्त झाल्यास शाकीय वाढ खूप जास्त होते आणि हळद काडावरती जाते.
  • फर्टिगेशन करताना प्रामुख्याने युरिया, फॉस्फरिक ॲसिड आणि पांढरा पोटॅशचा वापर करावा. हळद पिकात फर्टिगेशनची सुरुवात लागवडीनंतर १५ दिवसांनी करावी. जमिनीद्वारे द्यावयाची खतांची मात्रा आणि फर्टिगेशनद्वारे द्यावयाची खतांची मात्रा वेगवेगळी आहे.
  • पाणी व्यवस्थापन

  • पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी जर साठून राहिले तर मुळांना हवा घेण्यास अडथळा येतो. परिणामी पाने पिवळी पडून निस्तेज होऊन मलूल होताना दिसतात. अशा वेळी साचलेल्या पाण्याचा तत्काळ निचरा करावा.
  • सध्या पावसाचा कालावधी असल्याने वाकोऱ्याची शेवटची सरी कुदळीच्या साह्याने फोडून पाणी काढून द्यावे.
  • पावसाच्या कालावधीत जमिनीतील ओलावा अभ्यासून पाणी देण्याचे नियोजन करावे. रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. दोन लॅटरलमधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे. दोन तोट्यामधील अंतर जमिनीच्या प्रतीनुसार ठेवावे.
  • रेताड जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजण्याची शक्‍यता असते. या पद्धतीने पाणी दिल्याने १० ते १५ टक्के उत्पादन जास्त मिळते.
  • पाऊस समाधानकारक असेल तर हलक्‍या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत पाण्याच्या १३ ते १५ पाळ्या द्याव्या लागतात. जर पाण्याचे प्रमाण कमी पडले तर हळदीच्या कंदांची योग्य वाढ होत नाही, प्रक्रियेनंतर अशा हळकुंडांचा रंग फिका पडतो, चमक घटते परिणामी विक्री करताना दर कमी मिळतो.
  • तण नियंत्रण

  • हळद लागवडीपूर्वी मोठ्या प्रमाणात शेणखताचा वापर केला जातो. शेणखतातून तणांचे बी शेतात येते. या तणांचे वेळीच नियंत्रण होणे गरजेचे आहे. तणांचा प्रादुर्भाव दिसून आला तर हळद लागवडीपासून ६०, ९० आणि १२० दिवसांच्या अंतराने तणांच्या तीव्रतेनुसार मजुरांच्या साह्याने निंदणी करावी.
  • हळद उगवणीनंतर कोणतेही तणनाशक फवारू नये. जर तणनाशकाची फवारणी केली तर हळदीच्या शारीरिक क्रियांवर विपरीत परिणाम होतो. तसेच उत्पादनात घट येण्याची शक्‍यता असते.
  • आंतरपिकांची लागवड 

  • हळदीची मुळे आणि निवडलेल्या आंतरपिकाची मुळे जमिनीत एका खोलीवर येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
  • तूर, एरंडीसारख्या पिकांचा वापर हळदीमध्ये सावलीसाठी करावा. २५ टक्के सावलीमध्ये हळद पीक चांगले वाढते. आंतरपिके ही हळद पिकापेक्षा उंचीने कमी तसेच पसरणारी, कमी जागा व्यापणारी असावीत.
  • हळद पिकाची लागवड केल्यापासून ३ ते ३.५ महिन्यांनी फुटवे येऊन कंद पोसण्यास सुरुवात होते. हळकुंडे येणाऱ्या कालावधीपूर्वी आंतरपिकाची काढणी करणे फायदेशीर ठरते. आंतरपिकासाठी श्रावणघेवडा, झेंडू, मिरची, कोथिंबीर, तूर, उडीद, मूग या पिकांची निवड करावी. मका हे पीक हळदीमध्ये घेऊ नये, कारण मक्‍यामुळे हळदीच्या उत्पादनामध्ये १५ ते २० टक्के घट येते.
  • संपर्क - ०२३३-२४३७२७४ डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४ (प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com