कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधार

या वर्षी मी माझ्या १२ एकरांमध्ये कापसाची लागवड केली आहे. सध्या कापूस वेचणीला आला आहे. मजूर वेळेवर मिळत नसल्याने कापूस बोंडातून गळत आहे. नऊ ते दहा रुपये प्रतिकिलो देण्याची तयारी असूनही मजुरांसाठी ओढाताण सुरू आहे. - राजेश दामोधर,कापूस उत्पादक शेतकरी, तरोडा शेतीच्या कामांसाठी परप्रांतातील २० मजूर आमच्याकडे आहेत. त्यांना सर्व सोयीसुविधा द्याव्या लागत आहेत. मजूर मिळाले नाही, तर शेतातील पीक शेतातच राहते. आता कापूस वेचणीसाठी अशी स्थिती बनलेली आहे. - नितीन साबळे, शेतकरी
कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधार
कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधार

अकोला : अकोट तालुक्यातील ग्राम तरोडा व परिसरात शेतकऱ्यांनी कापसाची सर्वाधिक क्षेत्रावर लागवड केली आहे. कापूस वेचणीला सुरुवात झाली असून, वेचणीचा दर आठ ते दहा रुपये प्रतिकिलो, असा द्यावा लागत आहे. एवढा दर देऊनही कापूस वेचणीसाठी मजुरांची मोठी अडचण सर्वत्र भेडसावत आहे.

जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र दीड लाख हेक्टरपर्यंत आहे. एकाच वेळी सध्या वेचणीच्या कामाने वेग घेतला आहे. वेचणीसाठी मजुरांची त्यामुळे गरज वाढली आहे. यावर्षी कापूस वेचणी पाच रुपयांपासून १० रुपयांपर्यंत पोचलेली आहे. बहुतांश गावांमध्ये आठ ते दहा रुपये प्रतिकिलो वेचाई द्यावी लागत आहे. कापूस हे नगदी पीक आहे. या खरिपात सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी या सर्वच पिकांचे पूर्णतः नुकसान झालेले आहे. यातून वाचलेले कापसाचे पीकही आता वाढलेल्या मजुरीमुळे शेतकऱ्यांना परवडणारे राहिलेले नाही. कापसाची वेचाई ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल पडत असून कापसाला भाव मात्र ३५०० ते ४००० दरम्यान मिळत आहे.

वेचणीसाठी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात दर वाढला आहे. अतिपावसामुळे कापसाच्या बोंड्या काळ्या पडलेल्या आहेत. शिवाय कवडीचे प्रमाणही वाढलेले आहे. किडीने बोंड खराब केले. अशा बोंडातून कापसाची वेचणी मजुरांनाही अवजड जात आहे. त्यामुळे मजुरांकडून मजुरी वाढवून मागितली जात आहे. काही भागात सुरवातीला पाच रुपये प्रतिकिलो दराने वेचणी केली जात होती. मात्र आता मजुरांची मागणी वाढताच वेचाईचा दर सर्रास आठ ते दहा रुपये असा चुकवावा लागला आहे.

स्थानिक मजुरांसह परप्रांतातून आलेले मजूर या जिल्ह्यात वेचाईचे काम करीत आहेत. एकाचवेळी कापूस वेचणीला आल्याने अनेकांना मजूर मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अशावेळी मजुरांना वाढीव दरसुद्धा देण्याची तयारी ठेवावी लागते आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com