उन्हाळी हंगामात शेवगा पिकाचे छाटणी व्यवस्थापन

शेवग्याचे झाड झपाट्याने वाढणारे असून, शेवगा पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी छाटणी आणि वळण देणे महत्त्वाचे आहे.
उन्हाळी हंगामात शेवगा पिकाचे छाटणी व्यवस्थापन
उन्हाळी हंगामात शेवगा पिकाचे छाटणी व्यवस्थापन

शेवग्याचे झाड झपाट्याने वाढणारे असून, शेवगा पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी छाटणी आणि वळण देणे महत्त्वाचे आहे. शे वग्याचे झाड झपाट्याने वाढते. लागवडी नंतर ३-४ महिन्यातच झाडाची उंची १२०-१५० से.मी.होते. रोपे लागवडीनंतर जातीनुसार ७५-१०० सें. मी. किंवा ९०-१२० सें. मी. उंचीची झाल्यावर शेंडा हाताने खुडावा. म्हणजे फांद्या अधिक येतात. झाडाची उभट वाढ होत नाही. शेंगा झाडाच्या खालच्या बाजूला येऊन काढणी सुलभ होते. छाटणी करतेवेळी झाडाची साल निघणार नाही, याची काळजी घ्यावी. एका वर्षात झाडाला शेंगा येण्यास सुरुवात होते, म्हणून शेवग्याच्या झाडाला वळण देणे आणि छाटणी करणे आवश्यक असते. सुरुवातीच्या काळात छाटणी न केल्यास झाड उंच वाढून शेंगा काढणे अवघड जाते. शेवग्याच्या लागवडीनंतर झाडाची दोनदा छाटणी करावी. पहिली छाटणी लागवडीनंतर ३-४ महिन्यांनी करावी. त्यात झाडाचे मुख्य खोड जमिनीपासून १ मीटर अंतरावर छाटणी करावी. दुसरी छाटणी ७-८ महिन्यांनी करावी. यानंतर वर्षातून एकदा छाटणी करणे गरजेचे असते. दुसऱ्या छाटणी वेळी फांद्यांची छाटणी करावी. यामुळे मुख्य खोडावर अनेक उपफांद्या येतात, झाडाची उंची कमी राहते आणि झाडावरून शेंगा काढणे सोपे जाते. उत्पादनात वाढ होते. दरवर्षी दोन्ही बहराच्या शेंगा काढल्यावर एप्रिल ते मे महिन्यात खरड छाटणी करावी. जेवढ्या जास्त नवीन फांद्या येतील, तेवढे उत्पादन वाढते. झाड जसे जसे मोठे होईल तसेतसे पुढे दोन वर्षांनी एप्रिल महिन्यात शेंगांची तोडणी झाल्यानंतर फांद्यांची छाटणी करावी. बुंध्याजवळच्या फांद्या पूर्ण छाटून घ्याव्यात. प्रत्येक झाडापासून नियमित उत्पादन मिळते. शेंगा जास्त आल्यास बांबूचा आधार द्यावा. झाडाची उभट उंची जास्त राहू न देता घेरदार आणि कमी उंचीचे झाड तयार करण्याचा उद्देश ठेवावा.  छाटणीनंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम अधिक क्लोरपायरीफॉस प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. शेवग्याला वर्षातून दोनदा बहर येतो. प्रत्येक बहर घेताना खतांचा वापर करणे गरजेचे आहे. छाटणी झाल्यावर मात्र वर्षातून एकदा शेणखत वापरावे. शेणखताबरोबरच माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर करावा. एकरी ५० किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे खत द्यावे. त्यानंतर३० ते ४० दिवसांनी परत एकदा एकरी ५० किलो युरिया द्यावा. जमिनीचा प्रकार आणि झाडाची वाढ बघून युरिया खताचे प्रमाण कमीजास्त करावे. पहिला बहार निघाल्यानंतर नवीन पालवी फुटून फुले येऊ लागतात. अशावेळी परत एकरी ५० किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. खते चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये मिसळली जातील, याची काळजी घ्यावी. खताच्या पहिल्या हप्त्यानंतर पुन्हा ३० ते ४० दिवसांनी एकरी ५० किलो युरिया द्यावा. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविण्यास शेंगांचे प्रमाण, रंग, चकाकी आणि प्रत सुधारते. शेवग्याचा शेंडा जास्त वाढत असल्यास नत्र खताचा वापर कमी करावा. शेंगांची फुगवणं कमी होत असल्यास, तसेच फुलगळ कमी होऊन शेंगांची संख्या वाढविण्यासाठी स्फुरदयुक्त खतांचा जास्त वापर करावा. रोग व कीड नियंत्रण

  • शेवगा पिकावर रोग-किडींचे प्रमाण कमी असते. परंतु खतांचा असंतुलित वापर किंवा अयोग्य व्यवस्थापनामुळे रोग-किडींचे प्रमाण वाढू शकते. शेवग्यावर मुख्यतः वाळवी, पाने खाणारी अळी किंवा शेंडा कुरतडणारी अळी, तसेच करपा व डाऊनी रोगांचा प्रादुर्भाव होतो. कीड, रोगाचा प्रादुर्भाव ओळखून नियंत्रणाचे उपाय करावेत.
  • करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रती लीटर पाणी, कार्बेन्डाझिम एक ग्रॅम. 
  • मूळकूज विशेषतः भारी जमिनीत येते. फ्युजारिअम बुरशीमुळे मूळकूज होऊन रोपे लहानपणीच मरतात. तसेच मोठी झाडेही वाळतात. त्यासाठी लागवडीच्यावेळी खड्डा भरताना शेण खताबरोबर ट्रायकोडर्मा पावडर १० ग्रॅम मिसळावी.
  • बऱ्याचदा फुलांची गळ होते. फुलगळ विशेषतः वातावरणातील बदलामुळे, जमिनीतील अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे किंवा रोग-किडींच्या प्रादुर्भावामुळे होत असते. हे लक्षात घेऊन योग्य ते उपाययोजना कराव्यात.
  • फुलांची गळ थांबविण्यासाठी मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (००:५२:३४) पाच ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी उपयुक्त ठरू शकते.
  •  : भरत तांबोळकर, ९८२३८२८६४५ (सहाय्यक प्राध्यापक, उद्यान विद्या विभाग, सौ.के.एस.के.कृषी महाविद्यालय बीड. लक्ष्मण सुरनर हे पी.एच.डी. विद्यार्थी, उद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com