कीटकनाशकांच्या वापराबाबत जनजागृती आवश्यक : डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : मराठवाड्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी करताना कीटनाशकांचा सुरक्षित वापर करावा, यासाठी कृषी विद्यापीठ तसेच कृषी विभागाने जबाबदारीने जनजागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी शुक्रवारी (ता.१०) केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभाग आणि राज्य शासनाचा कृषी विभाग यांच्या तर्फे कृषी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये कीटकनाशकांचा सुरक्षित वापर या विषयावर आयोजित विभागीय कार्यशाळेत डाॅ. व्यंकटेश्वरलू बोलत होते.

या वेळी लातूर विभागाचे कृषी सहसंचालक डाॅ. आर. एस. भताने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे (परभणी), डाॅ. टी. एस. मोटे (नांदेड), श्री. चोले (उस्मानाबाद), प्राचार्य डाॅ. डी. एन. गोखले, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. पी.आर. झंवर, उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव, डाॅ. प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते.

डाॅ. व्यंकटेश्वरलू पुढे म्हणाले, की यवतमाळ जिल्ह्याप्रमाणेच तेलंगण तसेच ओडिशा राज्यातदेखील दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील तसेच पुढील खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा सुरक्षित वापर करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जनजागृती करणे आवश्यक आहे.

कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर माहिती फलक लावावेत. कीटकनाशकांची बाधा झालेल्या शेतकऱ्यांवर नेमके कोणते उपचार करावेत, यासाठी डाॅक्टरांच्या बैठकीचे आयोजन करून माहिती देणे आवश्यक आहे. डाॅ. भताने म्हणाले, की कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी कीटनाशकांच्या सुरक्षित वापराची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. बोंड अळीच्या प्रादुर्भाव झालेल्या विविध कंपन्यांच्या कपाशीच्या विविध वाणांची माहिती सादर करावी लागणार आहे.

तांत्रिक सत्रांमध्ये कीटनाशकांच्या किफायतशीर वापराबाबत डाॅ. पी. आर. झंवर यांनी कीटकनाशकाच्या वर्गीकरणाबाबत प्रा. बी. व्ही. भेदे यांनी, कपाशीवरील शेंदऱ्या बोंड अळीच्या व्यवस्थापनाबाबत प्रा. अनंत बडगुजर यांनी, डाॅ. एस. डी. बंटेवाड यांनी तूर पिकांवरील कीड व्यवस्थापनाबाबत, किडीच्या सर्वेक्षणाबाबत डाॅ. डी. पी. कुळधर यांनी माहिती दिली.

या कार्यशाळेत लातूर कृषी विभागातील सोयाबीन, कापूस आणि तूर, हरभरा या पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्राॅपसॅप) अंतर्गत कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठांतील जिल्हा समन्वयक सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com