लष्करी अळी उपाययोजनेसंबंधी लवकरच जनजागृती

लष्करी अळी उपाययोजनेसंबंधी लवकरच जनजागृती
लष्करी अळी उपाययोजनेसंबंधी लवकरच जनजागृती

औरंगाबाद : पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचे आक्रमण होऊ नये, यासाठी प्रचारथाच्या माध्यमातून जागृती सुरू झाली आहे. शिवाय मक्‍यावरील अमेरिकन लष्करी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी नेमके काय उपाययोजना करायला हव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विकासामार्फत लवकरच जाणीव जागृती मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली. 

श्री गंजेवार म्हणाले, की गतवर्षी गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे खरीप २०१८ मध्ये गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी, खासगी बियाणे व कीटकनाशके उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी आदींच्या समन्वयातून गावपातळीवर प्रशिक्षणे घेण्यात आली. १७ सप्टेंबर २०१८ ते २६ जानेवारी २०१९ यादरम्यान जिल्ह्यातील जवळपास ४०० शाळ्यांच्या सहकार्यातून प्रभात फेऱ्या काढून फरदड निर्मूलन, गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन व कीटकनाशक हाताळणी व सुरक्षितता याबाबत व्यापक जागृती करण्यात आली. त्याचा यंदाच्या हंगामात बोंड अळी नियंत्रणात मोठा फायदा झाला. पुढील हंगामातही बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सद्यःस्थितीत शेतात उभ्या असलेल्या पऱ्हाट्या नष्ट करणे, फरदड न घेणे, पऱ्हाटीची कुट्टी करून कंपोस्‍ट करणे, पऱ्हाटीची विल्हेवाट लावणे आदींविषयी जनजागृती करण्यासाठी तीन प्रचार रथ पुढील महिनाभर जिल्ह्यात जनजागृती करणार आहेत. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष व कृषी सभापती केशवराव तायडे यांच्या हस्ते या प्रचार रथांना नुकतीच हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमामध्ये खंड पडून पुढील हंगामात होणारा उद्रेक थांबविण्याच्या दृष्टीने फरदड निर्मूलनाचा नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचे श्री. गंजेवार सांगितले. 

यंदा मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव आढळून आला आहे. कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश आदी ठिकाणी मका पिकावर हैदोस घालणाऱ्या या अळीने महाराष्ट्रातही जवळपास दहा हजार हेक्‍टरवरील मका पिकाचे नुकसान केले आहे.

जास्त क्षेत्र असलेल्या तालुक्यांवर लक्ष प्रामुख्याने मकाचे क्षेत्र जास्त प्रमाणात असणाऱ्या कन्नड, सिल्लोड, खुलताबाद व फुलंब्री तालुक्‍यांत प्रामुख्याने मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी जनजागृती मोहीम लवकरच राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मक्याशिवायही तृणधान्य पिकांवर जगण्याची क्षमता असलेल्या या लष्करी अळीच्या भयानक संकटावर वेळीच प्रतिबंध करण्यासाठी जमिनीची खोल नांगरट व इतर उपाययोजनांची जाणीव जागृती नियोजित मोहिमेच्या माध्यमातून केली जाणार आहे. - आनंद गंजेवार, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com