पुणे जिल्हा बँकेला २२० कोटी रुपयांचा नफा

पुणे जिल्हा बँकेला २२० कोटी रुपयांचा नफा
पुणे जिल्हा बँकेला २२० कोटी रुपयांचा नफा

पुणे ः जिल्हा बँकांमध्ये अग्रगण्य स्थान मिळविलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मार्च २०१९ अखेर २२० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. शेतकरी कर्जमाफीची अनिश्चितता, जिल्ह्याच्या काही भागांत दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ढोबळ नफा झाला. बँकेचे ठेवीदार, खातेदार, शेतकरी सभासद यांनी बँकेवर दाखविलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाल्याचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले. 

यंदा मार्च २०१९ अखेर बँकेची एकूण उलाढाल १५,५५० कोटी रुपये असून, सभासदसंख्या दहा हजार ९०५ एवढी आहे. त्यापैकी नऊ हजार १७३ सहकारी संस्था व एक हजार ७३२ सभासद आहेत. बँकेचे भागभांडवल २९५.४५ कोटी रुपये आहे. बँकेच्या वसुलीसंदर्भात कर्जदार संस्थांनी, जिल्ह्यातील विविध कार्यकारी संस्थांनी व शेतकरी सभासदांनी घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड केल्यांने बँकेचा ग्रॉस व नेट एनपीए नाबार्डच्या निकषांनुसार निश्चित केलेल्या मर्यादेच्या आत आणण्यामध्ये बँकेला यश प्राप्त झाले आहे. 

तसेच बँकेने साखर कारखाने, पतसंस्था, वैयक्तिक कर्जदार यांना ६,६०० कोटींचा विविध प्रकारचा कर्जपुरवठा केला आहे. बँकेने चार हजार ६३८ कोटी १७ लाख रुपयांची गुंतवणूक केलेली असून, बँकेचे नेटवर्थ (नगद मूल्य) ७४३ कोटी ६ लाख रुपये एवढे आहे; तर बँकेचा सीडी रेशो (ठेवीच्या मर्यादेत कर्जवितरण) ७२.२० टक्के व सीआरएआर (भांडवल पर्याप्तता) १२ टक्के एवढा आहे.

भारतीय रिझर्व बँक, नाबार्ड यांनी जिल्हा बँकांना लागू केलेल्या विविध आर्थिक निकषांची पूर्तता बँकेने केली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण अर्थकारणांच्या, शेतकऱ्यांच्या, उद्योजकांच्या, पगारदारांच्या आर्थिक गरजा पूर्ण करीत आहेत. बँकेने सभासद, कर्जदार, ठेवीदार व जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी विभागातील सर्व स्तरांतील जनतेचा मोठा विश्वास संपादन केला आहे. ठेवीदारांनी बँकेवर ठेवलेल्या विश्वासास बँक कायम पात्र राहील. बँकेस  झालेल्या ढोबळ नफ्याची विभागणी संचालक मंडळ सभेमध्ये नियमानुसार योग्य प्रकारे करून बँकेचा सक्षम असलेला ताळेबंद अधिक सक्षम करण्याच्या मनोदय व्यवस्थापनाचा आहे.

शेतकरी हा केंद्रबिंदू मानून जिल्ह्यातील अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेसा कर्जपुरवठा करून बँक राष्ट्रीय उत्पादन वाढीस हातभार लावण्याचे काम करीत आहे. इतर राष्ट्रीयीकृत बँका केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून म्हणजेच मोठ्या शेतकरी वर्गास कर्जपुरवठा करण्यास प्राधान्य देत आहेत. शेती व शेतीपूरक व्यवसायांसाठी, महिला बचत गटांसाठी, सामान्य गोरगरीब जनतेसाठी दिला जाणारा कर्जपुरवठा हे बँकेचे बँकेचे मुख्य वैशिष्ट्ये आहे.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये बँकेचा सिंहाचा वाटा असून, ग्रामीण भागातील जनतेचा स्तर उंचावण्यात मोठे योगदान आहे. शेती व तत्स्यम पूरक उद्योगांचा विकास घडवून सहकारांचे जाळे मजबुतीने उभे करण्यामध्ये बँकेचा वाटा अधिक आहे. - रमेश थोरात, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com