पुणे जिल्ह्यात पाऊस पाठ सोडेना

पुणे जिल्ह्यात पाऊस पाठ सोडेना
पुणे जिल्ह्यात पाऊस पाठ सोडेना

पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे खरिपाच्या पिकांचे आणि नुकत्याच लागवड झालेल्या कांदा, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. बुधवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भोर तालुक्यातील किकवी येथे सर्वाधिक १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरण क्षेत्रातील पावसाने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.     

बारामती तालुक्यातील कऱ्हा नदीला आलेल्या पुरात कडेपठार येथील जगताप वस्तीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा भराव पुराच्या पाण्याने वाहून गेला. तर पुरामुळे काऱ्हाटीचा संपर्क तुटला आहे. महिनाभरापूर्वी हा भराव वाहून गेला होता. त्याच्या दुरुस्तीनंतर हाच भराव पुन्हा वाहून गेला आहे. आणखी पाणी वाढल्यास नदीकडेची शेती व पिकांचे नुकसान होणार आहे. पाण्याच्या फुगवट्यामुळे जाधववस्ती व सुप्याचा संपर्क तुटला. मुसळधार झालेल्या पावसामुळे दोंदे (ता. खेड) येथील ओढ्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहिल्याने तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील वाहतूक विस्कळित झाली. कडूस, रानमळा, किवळे, कुरकुंडी परिसराला सायंकाळी दमदार पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले. 

घोडेगाव, नारोडी (ता. आंबेगाव) परिसरात मुसळधार पावसामुळे परिसरातील ओढ्यांना पूर आला. नारोडी हद्दीतील रोहिमाळ-काळवटवस्तीवरील नवीन पूल वाहून गेला. घोडेगावजवळील कोटमदरा, पानमळा, नारोडी, लांडेवाडी, चिंचोडी येथे जोरदार पाऊस झाला. शेतात गुडघाभर पाणी साचल्याने भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी बांध फुटून शेतातील माती वाहून गेली. 

आंबेगाव तालुक्‍यातील साकोरे, लौकी, कळंब, महाळुंगे पडवळ, चांडोली बुद्रुक परिसरात सायंकाळी धुवाधार पाऊस पडला. चास येथे मुसळधार पावसाने ओढ्यांना पूर आले आहे. तसेच शेती जलमय झाली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका पालेभाज्या व तरकारी पिकांना बसला आहे. लागवड केलेले कांदा पीक वाहून गेले आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या क्षेत्रात सातत्याने पाऊस पडत असल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवावा लागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com