पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप 

पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक ठिकाणी उघडीप दिली आहे. पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक सरी पडल्या.
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप  In Pune district Rain exposure
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप  In Pune district Rain exposure

पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक ठिकाणी उघडीप दिली आहे. पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक सरी पडल्या असून, मावळातील पवना धरण क्षेत्रात अवघा आठ मिलिमीटर पाऊस पडला आहे. धरणातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. गेले काही दिवस झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून भात पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.  गेल्या १५ ते २० दिवस जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे पिकांना पोषक पाऊस झाल्याने पिके चांगलीच तरारली आहेत. सध्या तूर, कापूस, बाजरी पिके वाढीच्या व काढणीच्या अवस्थेत आहेत. तर बाजरी पिके कणसाच्या अवस्थेत आहेत. अति पावसामुळे मूग, उडीद पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. भात पिके जोमात असून, वाढीच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी भात पिकांवर रोग, किडीचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे.  जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस चांगलाच कोसळत होता. विशेषः हा पश्‍चिम पट्ट्यात पावसाची बऱ्यापैकी संततधार सुरू होती. त्यामुळे भात खाचरे भरल्याने ओसंडून वाहत आहेत. पूर्वेकडील शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खेड भागांत सततच्या पावसाने काहीसा दिलासा दिला आहे. मात्र तूर, बाजरी पिकांसाठी हा पाऊस पोषक झाल्याने अनेक ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. आतापर्यंत बऱ्यापैकी झालेल्या पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाली असून, विहिरी तुडुंब भरल्याची स्थिती आहे. त्यामुळे आगामी काळातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत झाली आहे.  

चार दिवसांपासून सतत पाऊस;  नगर जिल्ह्यात पिकांवर परिणाम 

नगर : नगर जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. खरिपाच्या पिकांवर मात्र पावसाचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसत आहे. नगर, नेवासा, पाथर्डी तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या नोंदीत राहुरी तालुक्यातील वांबोरी महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली. कर्जत तालुक्यात मात्र अजूनही चांगला पाऊस झाला नाही.  नगर जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती चांगली आहे. या महिन्यात नगर, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. चांगल्या पावसामुळे धरणात पाणीसाठा झाला असून, अकोल्यातील पावसामुळे मुळा, भंडारदरा, निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागांत पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने खरिपातील पिकांवर परिणाम झाला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान होत आहे. भाजीपाल्याचेही नुकसान होत आहे. शेवगाव तालुक्यात काही ठिकाणी जमिनी चिभडल्या आहेत. पीक उत्पादनावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. सकाळपर्यंत झालेला मिलीमीटरमध्ये पाऊस असा, पारनेर ः ३८, सुपा ः ४४, मांडवगण ः ३९, पाथर्डी ः ४८, माणिकदौडी ः ३७, टाकळी ः ३६, करंजी ः ५५, मिरी ः ५७, चांदा ः ३७, घोडेगाव ः ५१, सोनई ः ४४, वडाळा ः ३४, ब्राह्मणी ः ५८, वांबोरी ः १०७    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com