पुणे : ज्वारी पीक अमेरिकन लष्करी अळीच्या विळख्यात

The sorghum crop is known as the American military alley
The sorghum crop is known as the American military alley

पुणे ः यंदा खरीप हंगामात मका, कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या अमेरिकन लष्करी अळीचा आता ज्वारी पिकावरही प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहे. जिल्ह्यात सुमारे ३० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावरील ज्वारी पीक अमेरिकन लष्करी अळीच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे ज्वारीवर पहिल्यांदाच फवारणी करण्याची वेळ आली असून पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र दोन लाख ४६ हजार ९२४ हेक्टर असून त्यापैकी एक लाख १३ हजार ७१३ हेक्टरवर म्हणजेच ४६ टक्के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. यापैकी जवळपास ३० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत यंदा खरिपात मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. सुरुवातीच्या काळात अल्प प्रमाणात असलेला हा प्रादुर्भाव नंतर ६० ते ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागला. त्यातच कृषी विभाग, विद्यापीठांनी हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी केवळ शेतकऱ्यांना सल्ला देण्यात धन्यता मानल्याचे दिसून आले. 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. यंदा या पिकावरच लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शिरूर, इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, खेड या तालुक्यांतील शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत.

कृषी विभागाचे दुर्लक्ष ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. मात्र कृषी विभाग, कृषी विद्यापीठ व अन्य घटकांकडून अजूनही कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना होताना दिसत नाही. कृषी विभागातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती नाही. त्यामुळे ज्वारीचे पीक संकटात असताना उपाययोजना कधी करणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

लष्करी अळीच्या प्रादुर्भावाची लक्षणे पानाचा हिरवा पापुद्रा खाणे, त्यामुळे पानाला पांढरे चट्टे पडणे, दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेत पानाला छिद्र पडणे, पोंग्यातून एक सरळ रेषेत एक समान छिद्र होणे आदी लक्षणे या ज्वारी पिकांवर दिसू लागली आहेत.

यंदा अतिपावसाने खरिपातील पिके गेली. रब्बीत सुमारे पाच ते सहा एकरांवर ज्वारीची पेरणी केली होती. त्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून ज्वारीचे पीक गेले तर दुष्काळापेक्षाही गंभीर संकट उभे राहणार आहे. - भाऊसाहेब पळसकर, शेतकरी, करडे, ता. शिरूर.

महिन्यापूर्वी एक एकरावर ज्वारीची पेरणी केली होती. त्यानंतर ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नुकसान झाले. त्यामुळे ज्वारी मोडून उसाची लागवड केली आहे. - सुनील राजेभोसले, जोगवडी, ता. बारामती, पुणे.  

शिरूर तालुक्यात ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती मिळाली आहे. उर्वरित तालुक्यांमध्येही माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आल्यास तत्काळ उपाययोजना सुचविण्यात येतील.  - बी. जे. पलघडमल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com