पुणे विभागात सव्वीस दिवसांत ७१ मिलिमीटर पाऊस

पुणे विभागात सव्वीस दिवसांत ७१ मिलिमीटर पाऊस
पुणे विभागात सव्वीस दिवसांत ७१ मिलिमीटर पाऊस

पुणे ः जून महिना सुरू होऊन जवळपास पंचवीस दिवस ओलांडले आहेत. या कालावधीत पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली असली तरी काही अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पुणे विभागात आतापर्यंत सरासरीच्या ११५.३ मिलिमीटरपैकी ७१ मिलिमीटर म्हणजेच ६१.५ टक्के पाऊस झाल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. यामुळे खरीप पेरण्यांना काही प्रमाणात चालना मिळाली असल्याचे दिसून येते. 

मे महिन्यात पाणीटंचाई आणि उकाड्याने असह्य झाल्याने शेतकरी मॉन्सूनची वाट पाहत होते. यंदा मॉन्सूनची सुरवातीपासूनची वाटचाल अडखळत असल्याने राज्यात येण्यास उशीर झाला होता. अखेर वीस जूनच्या दरम्यान तळकोकणात मॉन्सूनचे आगमन झाले. तर पुणे, नगर, सोलापूर या भागांत २३ ते २४ जून या दरम्यान मॉन्सून दाखल झाला. 

यापूर्वी राज्यातील अनेक भागांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली होती. मॉन्सूनचे दाखल झाल्यानंतर पुणे विभागातील बहुतांशी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे उन्हाच्या झळा कमी होऊन शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. त्यातच चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरण्याची तयारी सुरू केली आहे. 

पुणे विभागात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी असला तरी सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांत, पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, नगर जिल्ह्यांतील श्रीगोंदा, जामखेड, कर्जत या भागात तुरळक सरी पडल्या होत्या. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच नऊ जूननंतर पावसाचा जोर वाढण्यास सुरवात झाली. या काळात पुणे विभागातील बहुतांशी भागात जोरदार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गेल्या आठवड्यातही पावसाचा जोर काहीसा कायम होता. जून महिन्यात नऊ जून पुणे विभागात जवळपास १२.३ मिलिमीटर तर २२ जून रोजी ११.९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 

विभागात पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात २६ दिवसांत सरासरीच्या ४१७.२ मिलिमीटरपैकी १३४.५ मिलिमीटर पाऊस पडला. तर दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्यात १०६.९ मिलिमीटरपैकी १००.३ मिलिमीटर पाऊस पडला. बारामतीत सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या ७८.५ मिलिमीटरपैकी २८.६ मिलिमीटर पाऊस पडला. कायम पाणीटंचाईग्रस्त असलेल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात सरासरीच्या १०८.४ मिलिमीटरपैकी १००.२ मिलिमीटर म्हणजेच शंभर टक्के पाऊस पडला. जामखेडमध्ये सरासरीच्या १२४.८ मिलिमीटरपैकी १०६.१ मिलिमीटर, श्रीगोंदा तालुक्यात सरासरीच्या ९६.१ मिलिमीटरपैकी १०२.२ मिलिमीटर पाऊस पडला. राहुरीमध्ये सर्वात कमी पाऊस पडला असून सरासरीच्या ९५.४ मिलिमीटरपैकी ४५.५ मिलिमीटर पाऊस पडला. सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यात ११४.३ मिलिमीटरपैकी १०१.० मिलिमीटर पाऊस पडला. तर मोहोळ तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com