पुणे विभागात पाण्याअभावी रब्बी पिके करपू लागली

पुणे विभागात पाण्याअभावी रब्बी पिके करपू लागली
पुणे विभागात पाण्याअभावी रब्बी पिके करपू लागली

पुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी पेरणीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. पुणे विभागातील नगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांत पेरण्या ५० टक्क्यांच्या आत राहिल्या असून, आत्तापर्यंत सरासरीच्या सतरा लाख ८१ हजार ३५ हेक्टरपैकी अवघ्या सात लाख ६२ हजार ७६३ हेक्टर म्हणजेच केवळ ४३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत असली तरी पाण्याअभावी सुकून करपू लागली आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे.

पुरेसा पाऊस न झाल्यामुळे गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून पुणे विभागात पाणीटंचाई सुरू झाली आहे. अनेक गावे व वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विभागातील पारनेर, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, पुरंदर, बारामती, शिरूर, इंदापूर, खेड, जुन्नर, आंबेगाव, मंगळवेढा, माढा, करमाळा, पंढरपूर, बार्शी, सांगोला, माळशिरस, अक्कलकोट या तालुक्यांत पाण्याची स्थिती अधिक गंभीर होऊ लागली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकेही अडचणीत आली असून, पिकांची वाढ खुंटली असल्याचे चित्र आहे. 

नगर जिल्ह्यात जिरायत भागातील ज्वारी पिके सुकून करपू लागले आहेत. त्यामुळे उत्पादनात ४० टक्क्यांपेक्षा जास्त घट येण्याची शक्यता आहे. बागायत ज्वारी कणसाच्या अवस्थेत आहे. काही भागांत पाण्याची कमतरता भासू लागल्याने उत्पादनात घट येईल. गव्हाचे पीक वाढीच्या व फुटव्याच्या अवस्थेत आहे. हलक्या जमिनीतील हरभरा पिके सुकू लागली आहेत. रब्बी हंगामातील पिकांच्या धान्य व चारा उत्पादन सरासरी ८० टक्के घटण्याची शक्यता आहे. 

पुणे जिल्ह्यातही रब्बी हंगामातील पेरणी झालेले पीक दाणे पक्वतेच्या अवस्थेत असून, दुष्काळजन्य परिस्थितीमुळे जिरायत ज्वारी पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे. 

गहू पीक वाढीच्या व ओंब्या येण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोऱ्याच्या व घाटे धरण्याच्या अवस्थेत आहे. सोलापूर जिल्ह्यात जमिनीतील ओलाव्याअभावी पिके सुकू लागली आहेत. हरभरा पीक घाटे धरण्याच्या अवस्थेत असून, पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली आहे.

जिल्हानिहाय रब्बी पेरणीची स्थिती, पेरणी हेक्टरमध्ये ः 
जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणीचे क्षेत्र 
नगर ६,६७,२६१ ३,१३,७१९ 
पुणे ३,९१,८९७ १,४३,३३८ 
सोलापूर ७,२१,८७७ ३,०५,७०६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com