पुणे विभागात ‘मनरेगा’च्या फळबागा लागवडीला घरघर

पुणे विभागात ‘मनरेगा’च्या फळबागा लागवडीला घरघर
पुणे विभागात ‘मनरेगा’च्या फळबागा लागवडीला घरघर

पुणे ः पाणीटंचाई आणि राज्य शासनाने सुरू केलेली पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेमुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) असलेल्या फळबाग लागवडीलाही चांगलीच घरघर लागली आहे. यंदा या योजनेतून पुणे विभागात अवघे २९४ हेक्टरवर लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाच्या दप्तरी झाली आहे. या योजनेतील जाचक निकषांमुळे आगामी काळात ही योजनाही अडगळीत पडण्याची शक्यता आहे.   

पुणे विभागातील नगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांत बहुतांशी शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांपासून डाळिंब, पेरू, आंबा, चिकू, सीताफळ, लिंबू अशा विविध फळपिकांची लागवड केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळू लागले आहे. मात्र, राज्य शासनाने रोजगार हमी योजनेतून मागील दोन ते तीन वर्षांपासून अनुदान बंद केले. त्यामुळे या योजनेतून फारशी लागवड झाली नाही. 

या कालावधीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीवर ( मनरेगा) भर दिला. परंतु या योजनेतील जाँब कार्डसारख्या असलेल्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांनी लागवड करण्याचे सोडून दिले होते. त्यामुळे फळबाग लागवडीच्या क्षेत्रात झपाट्याने घट होऊ लागली होती. यंदा पुन्हा राज्य शासनाने फळबाग लागवडीची योजना राबविण्याचे ठरविले. चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात आली. 

पुणे विभागातील शेतकऱ्यांसाठी १७ कोटी ५७ लाख ७६ रुपयांचा आर्थिक उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी २५ हजार ७४० अर्ज दाखल झाले असले तरी, मनरेगा योजनेतूनही चालू वर्षी १७ हजार १७० हेक्टरचा लक्ष्यांक देण्यात आला होता. पावसाळ्यात कमी झालेला पाऊस आणि दोन महिन्यांपासून सुरू झालेली पाणी टंचाईमुळे शेतकरी फळबाग लागवड करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. 

यंदा या योजनेअंतर्गत चार हजार ९०८ हेक्टरसाठी सुमारे ५ हजार ७४७ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी ३ हजार १२९ हेक्टर फळबाग लागवडीसाठी तांत्रिक मंजुरी, तर दोन हजार ५०४ हेक्टरसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी अवघ्या २९४ हेक्टरवर लागवड झाली असल्याची स्थिती आहे.

मनरेगाअंतर्गत झालेली फळबाग लागवड, हेक्टरमध्ये ः 
जिल्हा झालेली लागवड 
नगर २५५.७१ 
सोलापूर ७.१० 
पुणे ३२.०० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com