पुणे विभागात रब्बीच्या केवळ ४४ टक्के पेरण्या पूर्ण 

पुणे विभागात रब्बीच्या केवळ ४४ टक्के पेरण्या पूर्ण 
पुणे विभागात रब्बीच्या केवळ ४४ टक्के पेरण्या पूर्ण 

पुणे ः पाणी टंचाईमुळे रब्बीच्या पेरण्यांच्या क्षेत्रात चांगली घट झाली आहे. पुणे विभागात रब्बीच्या अवघ्या १७ लाख ८१ हजार ३५ हेक्टरपैकी अवघ्या सात लाख ७७ हजार ३६२ हेक्टर म्हणजेच अवघ्या ४४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या बागायत भागातील गहू, हरभरा पिके वाढीच्या व निसवण्याच्या अवस्थेत असून ज्वारीच्या पिकांची वाढ खुटली आहे.

यंदा कमी पावसामुळे जमिनीत ओल नसल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याचे टाळले आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या क्षेत्रात चांगलीच घट झाली आहे. रब्बीच्या पेरणीपासून पुणे विभागात सुमारे दहा लाख ३ हजार ६७३ हेक्टर क्षेत्र दूर राहिले आहे. परिणामी रब्बीच्या ज्वारी, गहू, हरभरा यासह सर्वच मुख्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात या अन्नधान्याच्या दरात चांगलीच वाढ होण्याचा अंदाज आहे. 

सध्या नगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील काही ठिकाणी जिरायत ज्वारी पिकांची वाढ खुंटली असून कणसे न लागल्यामुळे त्या पिकांची काढणी चालू झाली आहे. बागायती भागातील ज्वारीचीही काढणीस काही दिवसांचा अवधी बाकी आहे. काही भागात पाण्याची कमतरता भासू लागल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन चारा व धान्य उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे. 

गहू, हरभरा या पिकांची वाढ जोमदार आहे. परंतु काही ठिकाणी पाण्याची कमतरता भासत असल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील तूर पिकांची काढणी अंतिम टप्यात आली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी पिकांच्या काढणीच्या अवस्थेत आहे. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे जिरायत पिकांचे बाटुक झाले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येईल. गहू पीक ओब्या येण्याच्या व दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पीक दाणे पक्वतेच्या अवस्थेत असून काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहे. 

सोलापूर जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील जिरायत ज्वारी पिकांची पाण्याअभावी वाढ खुंटली आहे. पाण्याअभावी ज्वारी पिके सुकून गेले असून शेतकरी त्याचा वापर जनावरांसाठी चारा होईल म्हणून काढून घेत आहेत. जिरायत क्षेत्रावरील ज्वारी पिकांच्या उत्पादनात ५० टक्केपेक्षा जास्त घट येण्याची शक्यता आहे. गहू पीक ओंबी लागण्याच्या अवस्थेत तर हरभरा घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. मात्र, काही ठिकाणी पाण्याची टंचाई सुरू झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय रब्बीची झालेली पेरणी, हेक्टरमध्ये   
जिल्हा सरासरी क्षेत्र झालेली पेरणी टक्के 
नगर ६,६७,२६१ ३,१८,२९९ ४८ 
पुणे ३,९१,८९७ १,४७९,६२७ ३८
सोलापूर ७,२१,८७७ ३,०९,४३६ ४३ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com