पुणे बाजार समितीमधील १९ अडतदारांची दफ्तरे ताब्यात

पुणे बाजार समितीमधील १९ अडतदारांची दफ्तरे ताब्यात
पुणे बाजार समितीमधील १९ अडतदारांची दफ्तरे ताब्यात

पुणे ः डाळिंबाची प्रतवारी करण्याच्या नावाखाली शेतकरी आणि खरेदीदारांकडून हमालीच्या प्रचलीत दरापेक्षा जास्त आकारणी करत, कोट्यवधींची लूट केल्याप्रकरणी पुणे बाजार समितीमधील १९ अडतदारांची दफ्तरे प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. गेली अनेक वर्षे ही लूट सुरू होती. मात्र, काही शेतकरी आणि खरेदीदारांनी तक्रार केल्यानंतर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या प्रकरणात बाजार समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग असल्याची चर्चा असून, सहभागी असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर देखील कारवाईचा इशारा प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिला आहे.

पुणे बाजार समितीमधील डाळिंब विभागात काही अडते डाळिंबाच्या प्रतवारी करण्याच्या नावाखाली शेतकरी आणि खरेदीदारांकडून हमालीची नियमापेक्षा जादा वसुली करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेली अनेक वर्षे क्रेट मागे २५ ते ३० रुपये आकारणी केली जात आहे. बाजार समितीच्या नियमानुसार एका क्रेटच्या हमालीसाठी ५ रुपये आकारण्यात यावे, असे आदेश आहे. मात्र, या आदेशाची पायमल्ली करत अनेक अडतदार शेतकरी आणि खरेदीदारांची लूट करत आहेत. ही लूट कोट्यवधी रुपयांची असून, याची तपासणी करण्यासाठी संबंधित अडत्यांबरोबरच आवारातील अन्य अडत्यांची देखील दफ्तर तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत आत्तापर्यंत १९ संशयित अडत्यांची दफ्तरे ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. 

देशमुख म्हणाले, ‘‘संशयीत दफ्तर तपासणीसाठी चार पथके तयार केली असून, एका पथकात चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकांनी तक्रारी विभागातील ७, फळबाजारातील ६ आणि कांदा-बटाटा विभागातील ६ अडत्यांची दफ्तरे ताब्यात घेण्यात आली आहे. त्यांची तपासणी करण्यासाठी आठ सनदी लेखापाल यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडून तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे.’’

दफ्तर तपासणी दरम्यान दोषी आढळणाऱ्या अडत्यांकडून खर्चासहित तीन पट दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. कामात कुचराई केल्याबद्दल समितीच्या अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात येणार आहे. - बी. जे. देशमुख, प्रशासक  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com