पुणे, मुंबई, नाशिक बाजार समित्या सुरू असणार

शेतमालाचा पुरवठा सुरळीत होण्याकरिता पुणे, मुंबई आणि नाशिक बाजार समित्या सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासन, बाजार समित्या, अडते आणि कामगार संघटनांनी घेतला आहे.
APMC Pune
APMC Pune

पुणे/मुंबई/नाशिक: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये भाजीपाल्याचे मागणी अभावी होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि शहरात शेतमालाचा पुरवठा सुरळीत होण्याकरिता पुणे, मुंबई आणि नाशिक बाजार समित्या सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासन, बाजार समित्या, अडते आणि कामगार संघटनांनी घेतला आहे. यामुळे मुंबई गुरुवारपासून सुरू झाली असून, पुणे बाजार समिती रविवारी (ता.२९), तर नाशिक बाजार समितीचे कामकाज पेठरोड येथील बाजार आवारातून होणार आहे. 

पुण्यातील नियोजनाबाबत बोलताना पुणे बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख म्हणाले,‘‘शहरात शेतमालाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी रविवार (ता.२९) पासून पुणे बाजार समितीमधील विविध शेतमाल विक्री विभाग टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय प्रशासन आणि बाजार घटकांनी घेतला आहे. यामुळे रविवारी (ता.२९) कांदा, बटाटा आणि भाजीपाला विभाग, तर सोमवारी (ता.३०) फळ विभागातील व्यवहार सुरू करण्यात येणार आहे. 

बाजार समिती सुरू करताना बाजारात गर्दी होऊ नये म्हणून केवळ एक हजार घाऊक खरेदीदार आणि त्यांच्या तेवढ्याचा वाहनांना आवारात येण्यास परवानगी दिली जाईल. हा प्रवेश देखील २०० -२०० च्या गटाने टप्प्प्याटप्प्यात देण्यात येईल. खरेदी झाल्यानंतर बाजार समितीचे कर्मचारी आणि सुरक्षारक्षक हे टेम्पो तत्काळ आवारा बाहेर काढतील, असे नियोजन करण्यात आले आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. रविवार (ता.२९) पासून बाजार सुरू ठेवण्यात येणार आहेत. नंतर आठवडाभर नियमित सुरू ठेवण्याचे नियोजन आहे.  पुणे बाजार समिती

  • सर्व घटकांना (खरेदीदार, वाहनचालक, कामगार) जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन ओळखपत्रे देणार 
  • शेतमालाची वाहने पहाटे चार वाजता खाली झाल्यानंतर बाहेर काढणार 
  • पहाटे चार वाजता खरेदी विक्री सुरू करणार 
  • १ हजार खरेदीदार आणि टेम्पोंना २०० -२०० च्या टप्प्यांनी प्रवेश देणार 
  • दिवसाआड कांदा,बटाटा, तरकारी आणि फळबाजार सुरू करणार 
  • कामावर असा अन्यथा..  बाजार समितीतील कामकाज अत्यावश्‍यक सेवेत येते, त्यामुळे सर्व अधिकारी-कर्मचारी वर्ग उपस्थित राहणे बंधन कारक आहे. कामावर अनुपस्थित राहिल्यास आपल्याला कामाची आवश्‍यकता नाही असे समजून योग्य निर्णय घेतला जाईल असा इशारा बाजार समिती आस्थापना विभागाने दिला आहे.  मुंबई बाजार समिती सुरू  जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. यासंदर्भात मुंबई बाजार समिती प्रशासन, कोकण विभागीय आयुक्त, माथाडी संघटना आणि नवी मुंबई पोलीस यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत बाजार सुरू ठेवण्याबाबत नियम व नियमावली निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार आवक जावकेसाठी प्रत्येकी एकच गेट सुरू राहील. आवक प्रवेशद्वारावर शेतमालाचा वाहन चालक आणि साहाय्यकाची वैद्यकीय तपासणी करून मास्क व सॅनिटराईज करून आत सोडले जाईल व वाहनावर जंतुनाशकाने फवारणी करुनच बाजार आवारात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच व्यापारी, अडते, दलाल, खरेदीदार, वाहतूकदार, माथाडी कामगार, मापाडी आणि इतर सर्व घटकांना आवक प्रवेशद्वारावरच थर्मलचेकअप करून तसेच सॅनिटायझरने हात धुऊन आणि मास्क तोंडाला बांधून प्रवेश दिला जाणार आहे. या सूचनेचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. 

    बाजारातील गर्दी नियंत्रित करण्यासाठीच्या उपाययोजना 

  • क्षमतेनुसारच शेतमालाची आवक करा, 
  • गाळ्यावरच शेतमाल विक्री बंधनकारक 
  • इतरत्र माल विक्री करता येणार नाही.-पहाटे ४ पर्यंतच शेतमालाच्या वाहनांना प्रवेश 
  • पहाटे ४ नंतर वाहनांना प्रवेश नाही. 
  • एक तासात गाडी खाली करून आवारा बाहेर काढणे बंधनकारक
  • खरेदीदारांना पहाटे ४.३० वाजता वैद्यकीय तपासणी करून प्रवेश 
  • अडत्यांना पहाटे ५ ते सकाळी १० वाजेपर्यंतच विक्रीची परवानगी 
  • ११ नंतर सर्व घटकांना प्रवेश बंद. 
  • शुक्रवार (ता.२७) पासून भाजी व्यवसायातील प्रत्येक मदतनीस, कामगार इतर सर्व घटकास फोटो ओळखपत्र बंधनकारक 
  • सर्व वाहनांना स्टिकर बंधनकारक 
  • पोलिसांनी शेतमाल अडवू नये  जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलिसांनी आडवू नये, असे आदेश छान भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.  नाशिकचा बाजार पेठरोड येथे स्थलांतरीत  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारी शेतमाल विक्री नियमित पंचवटी मुख्य बाजार आवारात होत असते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून येथील होणारा बाजार पेठरोड येथील शरद पवार कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात विक्री होणार असल्याची माहिती सचिव अरुण काळे यांनी दिली. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बाजार समितीने यापूर्वी स्वच्छता मोहीम राबविली आहे. मात्र येथे गर्दी वाढल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. याबाबत खबरदारी घेऊन लिलावाच्या जागेत बदल करण्यात आला आहे. तसेच शेतकरी व भाजीपाला व्यापारी यांच्याव्यतिरिक्त इतर घटकांना मज्जाव करण्यात आलेला आहे. कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शासकीय सूचनांचे पालन करण्यात येत असून प्रत्येक घटकांना मास्क किंवा रुमाल बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासह वाहन व्यवस्था, गर्दी होऊ नये याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे सोशल डिस्टनसिंग पाळण्यासाठी बाजार समिती कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आले आहे.सध्या आवक ७० टक्क्यांनी घटल्याचे चित्र आहे, मात्र उपलब्ध भाजीपाला पोलीस प्रशासनाच्या रीतसर परवानगीने नाशिक मधून मुंबईला माल जाण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com