पुणे, नगर, साताऱ्यात अवकाळी पावसाचा द्राक्ष, आंबा, कांद्याला फटका

पुणे, सातारा आणि नगर जिल्ह्याला रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाचा फटाक बसला. काढणीला आलेली ज्वारी, गव्हू पिकांचे मोठे नुकसान झाले. आंबा, द्राक्षांसह कांद्याचेही नुकसान झाले आहे.
  पुणे, नगर, साताऱ्यात अवकाळी पावसाचा द्राक्ष, आंबा, कांद्याला फटका In Pune, Nagar, Satara, untimely rains hit grapes, mangoes and onions
पुणे, नगर, साताऱ्यात अवकाळी पावसाचा द्राक्ष, आंबा, कांद्याला फटका In Pune, Nagar, Satara, untimely rains hit grapes, mangoes and onions

पुणे : जिल्ह्यात रविवारी (ता. २१) आणि सोमवारी (ता. २२) झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये काढणीस आलेल्या गव्हू पिकाबरोबरच भाजीपाला पिके आणि द्राक्षांचे नुकसान झाले आहे. तर कैरीच्या अवस्थेतील आंब्याचे आणि मोहोराचे नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यात जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरुर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, इंदापूर, दौड, बारामती, पुरंदर तालुक्यातील विविध भागात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. इंदापूर शहर परिसरात रविवारी (ता.२१) रात्री विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे काहीकाळ वीजपुरवठा खंडित झाला होता. या पावसामुळे काढणीस आलेल्या गव्हाचे नुकसान झाले आहे. द्राक्षाच्या बागांना फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

बाभूळसर खुर्द (ता. शिरूर) येथे शनिवारी (ता. २०) सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्याचा रब्बी हंगामातील कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या वादळी वाऱ्यात कांद्याच्या माना व पाती पूर्णपणे मोडल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. येथील नुकसानग्रस्त कांदा पिकाचे कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी सरपंच सोनाली फंड यांनी केली  आहे.  

बहुतांश शेतकऱ्यांनी चढ्या दराने कांद्याची रोपे विकत घेऊन कांद्याच्या लागवडी केल्या होत्या. आता पीक ऐन जोमात असताना सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अडीच, तीन महिन्यांच्या कांदा अर्ध्या तासातच भुईसपाट झाले. पीक व खर्च दोन्ही वाया गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे पंचनामे होणार कधी व नुकसान भरपाई मिळणार कधी याकडे लागले आहेत. 

शिरूर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये शनिवारी (ता. २०) अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या व सध्याच्या वातावरणातील बदलाचा परिणाम पिकावर होत असून, गेल्या पाच-सहा दिवसांपासून सकाळी थोडे धुके, दुपारी कडक ऊन, सायंकाळी ढगाळ हवामानामुळे आंब्याचा मोहोर गळू लागला आहे. तर जुन्नर खेड आंबेगावमध्येही आंब्याला अवकाळीचा फटका बसला आहे. शेतकरी सागर रणदिवे म्हणाले, ‘‘ढगाळ वातावरणामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. गहू ,कांदा, भुईमूग, डाळिंब यावर किडीचा प्रादुर्भावाचा धोका निर्माण झाला आहे.’’

प्रतिक्रिया यंदा आंब्यांना मोहोर चांगला होता. परंतु शनिवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने व ढगाळ हवामानामुळे काही झाडांचा मोहर गळून पडला आहे. मोहरावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे.

- संभाजी कुटे, शेतकरी, न्हावरे (ता. शिरूर) 

फलटण, वाई तालुक्‍यांत वादळी वाऱ्यासह पाऊस फलटण, वाई तालुक्यांत रविवारी (ता. २०) दुपारी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचल्याचे चित्र दिसून येत होते. आंबा, ज्वारी, गहू, डाळिंब, द्राक्षाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

फलटण परिसरात रविवारी साडेचार वाजता शहराच्या मध्यवर्ती भागासह शहराच्या उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली. महात्मा फुले चौक, डी. एड. कॉलेज चौक, पृथ्वी चौक व कोळकी या भागात पावसाचा वेग अधिक राहिला तर विडणीमध्येही जोरदार पावसासह गारांचा वर्षावही झाला. या तालुक्‍यातील आदर्की, हिंगणगाव, सासवड, घाडगेवाडी, आळजापूर या भागात कमी जास्त स्वरूपात झाला आहे. वाठार निंबाळकर परिसरातील तावडी, वाखरी, ढवळ, शेरेवाडी, वाठार निंबाळकर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. या पावसाने आंबा, ज्वारी, गहू, डाळिंब, द्राक्षाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. वाई तालुक्यातील विरमाडे, आनेवाडी परिसरातही दमदार पाऊस झाला आहे.

नगरमध्ये दुसऱ्या दिवशीही गारपिटीचा तडाखा नगर : नगर जिल्ह्यातील अनेक भागात रविवारी दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा बसला आहे. जोरदार पाऊस आणि गारांमुळे शेतपिकाचे नुकसान होत असल्याने त्रस्त झाले आहेत. झालेल्या नुकसानीची प्रशासनाकडून पंचनामे सुरू केले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

नगर जिल्ह्यातील पाथर्डी, नगर, नेवासा, शेवगाव, राहुरी, संगमनेर, पारनेर यासह अन्य काही तालुक्यात रविवारी (२१) दुसऱ्या दिवशी सायंकाळी गारपीटीचा तडाखा बसला. सायंकाळी पाचनंतर जोरदार पावसाला सुरवात झाली. काही ठिकाणी वादळी वारे होते. जोरदार पावसासोबत गाराचाही तडाखा बसला. त्याचा कांदा, काढणीला आलेला गहू, हरभऱा, भाजीपाला, फळपीके तसेच आंब्याचे नुकसान झाले. पाथर्डी तालुक्यात दोन दिवसात पंधरा गावांतील शेतपिकांना फटका बसला. काळेगाव येथे घर पडलेल्या कुटुंबाला आमदार मोनिका राजळे यांनी दहा हजारांची आर्थिक मदत केली.

संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील खांबे, वरवंडीसह अन्य भागात तसेच खांबे, वरवंडी, शेंडेवाडी, मांडवे, पिंपळगाव देपा, तसेच राहुरी तालुक्‍यातील म्हैसगाव, चिखलठाण आदी गावांत मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत. दोन दिवसात नेमके किती नुकसान झाले, याची माहिती मिळेल असे सांगण्यात आले. नगर शहरातही अर्धा तास जोरदार पावसासह गारपीट झाली.

आर्थिक मदत करण्याची मागणी  शेवगाव तालुक्यात शेतपिकांचे गारपीट व पावसाने मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची ज्येष्ठे नेते ॲड. विद्याधर काकडे, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी पाहणी केली. ‘‘शेतकरी नैसर्गिक संकटाने त्रस्त आहेत. सातत्याने नुकसान होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी,’’ अशी मागणी ॲड. काकडे यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com