पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये शाळा, कॉलेज बंद; परिक्षा नियमित

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये शाळा, कॉलेज बंद; परिक्षा नियमित
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये शाळा, कॉलेज बंद; परिक्षा नियमित

मुंबई : कोरोनाची लागण रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. तसेच,  चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जिम, जलतरण तलावही बंद राहतील. हे निर्णय शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू केले आहेत. मात्र, दहावी-बारावी व एमपीएससीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार आहेत. 

मॉल, रेस्टॉरंट आदी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्द वगळता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू राहतील, असे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी स्पष्ट केले.  पुण्यासह मुंबई, नागपुरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने लोकांत घबराट असून, या रुग्णांचा आकडा वाढण्याची भीती आहे. त्यावर उपाय म्हणून स्थानिक यंत्रणांपाठोपाठ राज्य सरकारनेही कठोर पावले उचलली आहेत. देशभरात दहशत माजवणारा कोरोना महाराष्ट्रातही हातपाय पसरत असल्याने त्याला रोखण्याची सर्व तयारी राज्य सरकारने केली आहे. त्याबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड, ठाणे आणि नागपूर या शहरांत साथीचे रोगप्रतिबंधक कायदा लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अठरा झाल्यानंतर सरकारने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. 

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर सरकारचे लक्ष असून चीन, दक्षिण कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि इराण या देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना निगराणीखाली ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या देशांतून जे रुग्ण येतील त्यांना मात्र विमानतळावरच विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. 

एमपीएससीची परीक्षा रविवारी होणार  राज्य लोकसेवा आयोगाकडून रविवारी सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाची पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. त्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आयोगाचे सचिव प्रदीपकुमार याबाबत म्हणाले, की परीक्षेची सर्व तयारी झाली आहे. प्रश्‍नपत्रिकांचेदेखील वितरण झाले आहे. त्यामुळे परीक्षा रद्द केली जाणार नाही. या परीक्षेला उपस्थित उमेदवारांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षाही वेळापत्रकानुसारच होतील.

सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी  राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर सरकारने बंदी घातली आहे. यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांचा समावेश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील कोरोना संसर्गाचे रुग्ण पुणे - ७, मुंबई - ४, नागपूर - ३, पिंपरी चिंचवड - ३, ठाणे - १, नगर - १ दिवसातील संशयित - १३३

सुरक्षिततेसाठी पुणे शहर, पिंपरी- चिंचवडमधील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील परिस्थिती लक्षात घेऊनच त्या सुरू केल्या जातील. सर्व प्रकारच्या खबरदारीच्या आदेशाची कठोर अंमलबजावणी होईल. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com