दुर्गम भागात खडकातील पाण्याच्या टाक्या उभारणार

दुर्गम भागात खडकातील पाण्याच्या टाक्या उभारणार
दुर्गम भागात खडकातील पाण्याच्या टाक्या उभारणार

पुणे : दुर्गम डोंगराळ भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्‍न सुटावा, पाण्यासाठी होणारी वणवण थांबावी, यासाठी जिल्ह्यात ३१ ठिकाणी खडकातील टाक्‍यांच्या कामांना सुरवात करण्यात आली आहे. नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत ही कामे हाती घेण्यात आली असून, या टाक्‍यांमुळे भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. पावसाळा सुरू होण्याआधी ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. 

सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या दुर्गम, डोंगराळ भागात पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. या भागात उतार अधिक असल्याने हे पाणी साठून न राहता वेगाने वाहून जाते. त्यामुळे पाण्याअभावी तेथे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर टंचाईला तोंड द्यावे लागते. यंदाही पुरेसा पाऊस न झाल्यामुळे बहुतांश डोंगराळ भागातील गावे, वाड्या-वस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 

अति दुर्गम डोंगराळ भागात टॅंकरने पाणीपुरवठा करणे आणि पाणीपुरवठ्यासाठी उपसा योजना करणे शक्‍य होत नाही. परिणामी रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी दूर अंतरापर्यंत पायपीट करावी लागते. याअाधी काही भागात अशा टाक्‍या खोदल्याने पाण्याचा प्रश्‍न कायमचा सुटला आहे. यंदा जिल्ह्यातील ३१ ठिकाणी खडकातील टाक्‍यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये वेल्हा आणि खेड तालुक्‍यात प्रत्येकी ७ टाक्‍या घेण्यात येणार आहे. 

आंबेगाव, भोर, जुन्नर आणि मावळ तालुक्यात प्रत्येकी ४ टाक्या, तर मुळशी तालुक्यात १ खडकातील टाकी घेण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी २५ लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com