जालन्यात वर्षभरात ४२९ टन रेशीम कोष खरेदी 

बाजार समितीच्या आवारातील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत गत आर्थिक वर्षात सुमारे ४२९ टन रेशीम कोषाची खरेदी करण्यात आली आहे.
Purchase of 429 tons of silk cocoons in Jalna during the year
Purchase of 429 tons of silk cocoons in Jalna during the year

जालना : येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या मात्र आता जवळपास स्थिरावलेल्या स्थानिक बाजार समितीच्या आवारातील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत गत आर्थिक वर्षात सुमारे ४२९ टन रेशीम कोषाची खरेदी करण्यात आली आहे. दिवसाला जवळपास २ ते ३ टन रेशीम कोषाची आवक होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

जवळपास तीन वर्षांपूर्वी जालना बाजार समितीच्या आवारात मराठवाड्यासह राज्यातील सर्व रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून रामनगरमच्या धर्तीवर रेशीम कोष खरेदी बाजारपेठ सुरू करण्यात आली. सुरुवातीला या बाजारपेठेला प्रतिसाद मिळेल की नाही असे वाटत असतानाच हळूहळू रेशीम कोष उत्पादकांचा कल या बाजारपेठेकडे वाढला. 

गत आर्थिक वर्षात कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे एप्रिलला सुरू होणारी बाजारपेठ तब्बल २१ जुलैला सुरू झाली. तेव्हापासून ३१ मार्च अखेरपर्यंत जालना बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या रेशीम कोष बाजारपेठेत ४८७२ शेतकऱ्यांच्या ४२९ टन रेशीम कोषांची खरेदी करण्यात आली. या खरेदीतून जवळपास १२ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले. १०० रुपये प्रतिकिलोपासून उच्चांकी ४६० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर वर्षभरात मिळालेल्या या बाजारपेठेतील रेशीम कोषाचे सरासरी दर २८० रुपये प्रतिकिलो राहिले. तर दिवसाला २ ते ३ टनांपर्यंत रेशीम कोषाची आवक प्रतिदिन झाली. 

या बाजारपेठेत मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह नगर, नाशिक, जळगाव, धुळे नंदूरबार व पालघर आदी जिल्ह्यांतून रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला होता. ४८७२ शेतकऱ्यांकडील आलेल्या ४ लाख २२८ हजार ६९४ किलो ७० ग्रॅम रेशीम कोषाच्या खरेदीत जवळपास २६ रिलर व व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये पश्‍चिम बंगाल, कर्नाटकांसह महाराष्ट्रातील खरेदीदारांचा सहभाग असल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहीते यांनी दिली. आगाऊ नोंदणी करून कोरोनाचे संकट पाहता नियमांचे पालन करून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद करूनच गर्दी होणार नाही, असे पाहत खरेदीसाठी शेतकऱ्यांना माल घेऊन येण्याची सूचना केली जात असल्याचे रेशीम बाजारपेठेच्या सूत्रांनी सांगितले. 

मार्चमध्ये ६२७ उत्पादकांनी आणले कोष  मार्च २०२१ मध्ये विविध जिल्ह्यांतील जवळपास ६२७ शेतकरी आपले रेशीम कोष जालना रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत घेऊन आले. त्यांच्याकडील ६२ हजार ५५७ किलो ५६० ग्रॅम कोषाच्या खरेदीत १३ रिलर व व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. 

गतवर्षीच्या तुलनेत उलाढाल १०० टनांनी वाढली ही बाब उत्साह वाढविणारी आहे. बाजारपेठेची नवीन इमारतही आकार घेते आहे. त्या ठिकाणी सर्व सुविधा कोष उत्पादक व व्यापाऱ्यांना मिळणार आहेत.  - अजय मोहिते,  रेशीम विकास अधिकारी, जालना   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com