पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी 

फळपीक बागायतदार संघाने गेल्या पाच दिवसांत ५० टन काजू बी खरेदी केली असून, प्रतिकिलो १२५ रुपये प्रमाणे काजू उत्पादक शेतकऱ्यांना ६२ लाख ५० हजार रुपये अदा केले आहेत.
Purchase 50 tons of cashew nuts in five days
Purchase 50 tons of cashew nuts in five days

सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या पाच दिवसांत ५० टन काजू बी खरेदी केली असून, प्रतिकिलो १२५ रुपये प्रमाणे काजू उत्पादक शेतकऱ्यांना ६२ लाख ५० हजार रुपये अदा केले आहेत. कोरोना निर्बंधामुळे आठवडा बाजार आणि त्यानंतर संपूर्ण बाजारपेठच बंद झाल्यामुळे काजू बी खरेदी रखडली होती. बागायतदार संघाने घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

जिल्ह्यात आठवडा बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात काजू बीची खरेदी विक्री होते. याशिवाय काही बाजारपेठांमध्ये व्यापारी काजू बीची खरेदी करीत असतात. परंतु कोरोना संसर्ग वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला आठवडा बाजार बंद केले. त्यामुळे आठवडा बाजारादिवशी होणारी खरेदी-विक्री पूर्णतः थांबली. त्यानंतर राज्य शासनाने कडक निर्बंध जारी केल्यानंतर आता जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. त्याचा मोठा परिणाम काजू बी खरेदी- विक्रीवर झाला आहे. 

शेकडो उत्पादकांच्या घरात अजूनही कित्येक टन काजू बी शिल्लक आहे. त्यातच खरेदी-विक्री थांबल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु सावंतवाडी- दोडामार्ग फळपीक बागायतदार संघाने काजू बी खरेदीसाठी पुढाकार घेतला आहे. संघाने सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील बांदा, डिंगणे, डोंगरपाल, नेतर्डे, आडाळी, मोरगाव, पडवे माजगाव, डेगवे, विलवडे, इन्सुली, दाभिल, मडुरा, रोणापाल, पाडलोस, आरोस, निगुडे, सातोसे या गावांत गेल्या पाच दिवसांपासून काजू बीची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. 

पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बीची संघाने खरेदी केली असून, उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिकिलो १२५ रुपये प्रमाणे ६२ लाख ५० हजार रुपये वितरित केले आहे. सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन तालुक्यांत मोठ्या प्रमाणात काजू लागवड असून, २३ हजार टन काजू उत्पादित होतो. याशिवाय या भागातील काजू बी उर्वरित जिल्ह्यातील काजूपेक्षा अधिक दर दिला जातो. 

कोरोना निर्बंधामुळे काजू बी खरेदीत व्यत्यय आला होता. तो दूर करण्याचा बागायतदार संघाने प्रामाणिक प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काजू बी हमीभाव मिळवून देण्यासाठी कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन काजू उत्पादकांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.  - विलास सावंत, अध्यक्ष, फळपीक बागायतदार संघ, सावंतवाडी-दोडामार्ग 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com