जळगावात सीसीआय केंद्रांबाबत शेतकऱ्यांच्या पुन्हा तक्रारी

कापूस महामंडळाने (सीसीआय) कापसाची खरेदी सुरू केली आहे. परंतु खरेदी प्रक्रियेत आता एकाधिकारशाही गाजू लागली आहे. जळगाव तालुक्याचे खरेदी केंद्र आठ दिवसांत दोनदा बंद करण्यात आले.
Purchase of cotton at arbitrary rate in Jalgaon
Purchase of cotton at arbitrary rate in Jalgaon

जळगाव ः कापूस महामंडळाने (सीसीआय) कापसाची खरेदी सुरू केली आहे. परंतु खरेदी प्रक्रियेत आता एकाधिकारशाही गाजू लागली आहे. जळगाव तालुक्याचे खरेदी केंद्र आठ दिवसांत दोनदा बंद करण्यात आले. शेतकऱ्यांना तिष्ठत ठेवले जात आहे. याच वेळी अधिकाराचा गैरवापर करून ग्रेड (दर्जा) ठरवून ५६१५ रुपये प्रतिक्विंटल या दरात कापसाची खरेदी करण्याचा प्रकारही झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

सीसीआयने खानदेशात सुमारे १८ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. कारण खासगी व्यापारी, दलाल खेडा खरेदी करीत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना सीसीआयकडेच कापूस विक्रीचा पर्याय आहे. अशातच आता किरकोळ कारणांवरून खरेदी प्रक्रिया एकाधिकारशाहीने राबविण्याचा प्रकार सुरू असून, ग्रेडर मनमानी करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

जळगाव येथील खरेदी केंद्राबाबत अधिकच्या तक्रारी आहेत. मध्यंतरी चोपडा येथेही तक्रारी होत्या. तेथे एका शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला धक्काबुक्कीही झाली होती. जळगाव तालुक्यासाठी दोन मुख्य केंद्र व तीन उपकेंद्र आहेत. एक केंद्र जळगाव शहरात आहे. दुसरे धामणगाव येथे तर उर्वरित तीन केंद्रे आव्हाणे येथे आहेत. या केंद्रांमधील कापूस खरेदी गेल्या आठ दिवसांत दोनदा बंद करण्यात आली. मध्यंतरी पावसाळी वातावरणाने खरेदी बंद होती. गेल्या आठवड्यात साठा व प्रशासकीय कामकाज प्रलंबित असल्याचे कारण देऊन खरेदी बंद केली. तर मंगळवारी (ता. २२) देखील साठा व इतर कारणे सांगून खरेदी सायंकाळी बंद करण्याचे पत्र सीसीआयच्या ग्रेडरनी दिले.

यामुळे कापूस विक्रीसाठी केंद्रात आलेली अनेक वाहने रात्री परत केली. आता खरेदी किमान तीन दिवस बंद राहील, असे सांगितले जात आहे. या आठवड्यात सोमवारी (ता. २१) खरेदी सुरू झाली. लागलीच ती मंगळवारी बंद झाल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी, संताप आहे. खरेदी २४ तास सुरू ठेवा. शासनाने तशी व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.

एकाच भागात दोन दर सीसीआयने सोमवारी (ता. २१) जळगाव येथील केंद्रात जी कापूस खरेदी केली. त्यापोटी अनेकांना कमी दर्जाचा कापूस (दुय्यम ग्रेड) ५६१५ रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला. याच वेळी चोपडा, पाचोरा (जि. जळगाव) येथील केंद्रात कापसाला ५७२५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. चोपडा, पाचोरा, जळगाव या तालुक्यांमधील अंतर ६० ते ७० किलोमीटरच्या परिघात आहे. या भागात बीटी कापूस पीक असते. दर्जा (लांबी, रुईचे प्रमाण, सरकी आदी) एकसारखाच असतो. असे असतानाच जळगावच्या केंद्रात कमी दर दिला.

शेतकऱ्यांचा कापूस दर्जेदार असल्यास त्याला चांगला किंवा सर्वाधिक दर मिळायला हवा. पण जळगावला कमी दर्जाचा कापूस येत आहे. जळगावचे केंद्र बंद करण्याचा विचार यामुळे सुरू होता. आताही दबाव आणला तर आम्ही केंद्र बंद करू. आम्ही केंद्रीय संस्था म्हणून काम करतो. आम्हाला कापसाचा दर्जा ठरविण्याचा अधिकार आहे. पण शेतकऱ्यांचे नुकसानही आम्ही करीत नाही. - एस. के. पाणिग्रही, मुख्य महाव्यवस्थापक, सीसीआय

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com