परभणी जिल्ह्यात पणन महासंघातर्फे दोन केंद्रांवर कापूस खरेदी

 Purchase of cotton at two centers by the Panan mahasangh in Parbhani district
Purchase of cotton at two centers by the Panan mahasangh in Parbhani district

परभणी : ‘‘महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे सोमवारी (ता.२) जिल्ह्यातील बाभळगाव फाटा (ता.पाथरी) आणि गंगाखेड येथील केंद्रांवर कापूस खरेदी सुरू करण्यात आली. मुहूर्तावर दोन्ही केंद्रांवर एकूण १ हजार ६७१ क्विंटल कापूस खरेदी झाली,’’ अशी माहिती पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक ए. डी. रेनके यांनी दिली.

सोमवारी (ता.२) दुपारी बाभळगाव फाटा (ता. पाथरी) येथील केंद्रावर कापूस खरेदीचे उद् घाटन झाले. या वेळी आमदार बाबाजानी दुर्राणी, पणन महासंघाचे प्रशासक पंडितराव चोखट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते, विभागीय व्यवस्थापक ए. डी. रेनके, उपव्यवस्थापक आर. ए. वाघ, केंद्रप्रमुख पी. एल. कदम, सुभाष कोल्हे, गोपाल अग्रवाल आदींसह शेतकरी उपस्थित होते.

बाभळगाव फाटा येथे पहिल्या दिवशी ९२८ क्विंटल कापसाची खरेदी झाली. सोमवारी (ता.२) दुपारी गंगाखेड येथील खरेदी केंद्रावर बाजार समितीचे सभापती बालासाहेब निरस यांच्या हस्ते काटापूजन करून खरेदीस सुरुवात करण्यात आली. या वेळी केंद्र पणन महासंघाचे उपव्यवस्थापक आर. ए. कदम, प्रमुख एम. जी. पुराणकर आदींसह शेतकरी उपस्थित होते. गंगाखेड येथील परळी रस्त्यावरील केंद्रावर ७४३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. 

राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर ८ ते १२ टक्के ओलावा असलेला कापूस स्वीकारण्यात येईल. आठ टक्के ओलावा असेल, तर संपूर्ण हमीभावाने (लांब धाग्याचा कापूस प्रतिक्विंटल ५ हजार ५५० रुपये) खरेदी केली जाईल. परंतु, त्यानंतर ओलाव्याच्या प्रमाणानुसार हमीभाव दरातून १ टक्का रक्कम कपात केली जाईल. १२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असलेला कापूस स्वीकारला जाणार नाही. शेतकऱ्यांनी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणताना काडी कचराविरहित, स्वच्छ, कवडीचे प्रमाण नसलेला कापूस आणावा. सोबत चालू वर्षीची अद्ययावत पीकपेरा असलेला सातबारा उतारा आणावा. 

कापसाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर आरटीईजीएसद्वारे आठ दिवसांच्या कालावधीत जमा केले जातील. त्यामुळे आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक पासबुकची सत्यप्रत तसेच आधार कार्डची सत्यप्रत देखील सोबत आणावी. केवळ चारचाकी वाहनांमध्ये आणलेल्या कापसाची खरेदी केली जाईल, असे आवाहन रेनके यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com