जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने खतांची खरेदी

खतांची टंचाई जूनपासून आहे. युरिया जादा दरात किंवा लिंकींगने घ्यावा लागत आहे. यात खतांवरचा उत्पादन खर्च वाढला आहे. - रमेश पाटील,शेतकरी, चोपडा (जि.जळगाव)
 Purchase of fertilizers at extra rate due to scarcity in Jalgaon district
Purchase of fertilizers at extra rate due to scarcity in Jalgaon district

जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण खतांची टंचाई सुरवातीपासून कायम आहे. जुलै अर्धा संपला तरी खतटंचाई आहे. शेतकऱ्यांना जादा दरात खरेदी करावी लागत आहे. युरिया, १०.२६.२६ आणि दाणेदार फॉस्फेटची टंचाई सर्वत्र आहे. याला पर्याय म्हणून डीएपी व पोटॅश हे महागडे खत शेतकऱ्यांना वापरावे लागत आहे. 

खरिपात कापूस पीक सुमारे साडेपाच ते पाच लाख हेक्टरवर असते. त्यात पूर्वहंगामी (बागायती) कापसाचे क्षेत्र दरवर्षी किमान ६६ ते ८० हजार हेक्टरपर्यंत असते. यंदाही पूर्वहंगामी कापूस अधिक आहे. त्यासाठी खतांची मात्रा जूनमध्येच देण्यास सुरवात होत असते. परंतु, हंगाम सुरू झाला, तशी खतटंचाईदेखील तयार झाली. 

युरिया सुरवातीलाच बाजारातून गायब झाला. नंतर १०.२६.२६ हे खत कमी झाले. फॉस्फेटची टंचाई तयार झाली. कापूस पिकासाठी सुरवातीपासून १०.२६.२६ चा वापर जिल्ह्यात केला जातो. त्याची एक गोणी ११५० ते ११७५ रुपयाला आहे. परंतु, हे खत नसल्याने डीएपीची ११७५ व १२२५ रुपयांची गोणी घ्यावी लागत आहे. १०.२६.२६ सोबत युरिया देतात. पण, युरियादेखील नाही.

डीएपीमध्ये पोटॅश नसते. यामुळे डीएपीसोबत पोटॅश घ्यावे लागते. त्याचे दर ७८० रुपये गोणीपासून ८०० रुपयांपुढे आहेत. अर्थातच खतांचा खर्च युरिया व १०.२६.२६ नसल्याने वाढला आहे. जिल्ह्यासाठी एकूण एक लाख १० हजार मेट्रिक टन युरियाचा पुरवठा होईल, अशी मंजुरी आयुक्तालयाने दिली आहे. यातील ४२ हजार टन युरिया जिल्ह्यात दाखल झाला. पुरवठा व्यवस्थित झाला, पण कृत्रीम टंचाई तयार केली. एका शेतकऱ्याला पाचच युरियाच्या गोण्या दिल्या जातील. यापेक्षा अधिक युरिया हवा असेल, तर त्यासोबत ११०० ते १२०० रुपये किमतीची संयुक्त खताची  गोणी घ्यावी लागेल, अशी सक्ती सुरू आहे. ग्रामीण भागात युरियाची एक २६६ रुपयांची गोणी ३०० ते ३१० रुपयाला दिली जात आहे. 

रेल्वे मालधक्का बंदच

सुपर फॉस्फेट जूनमध्ये मिळत नव्हते. फॉस्फेटचा हंगामाअखेरपर्यंत सुमारे ५० हजार मेट्रिक टन पुरवठा होईल. यातील निम्मे फॉस्फेट खताचा पुरवठा झाला आहे. परंतु, तरीदेखील त्याची टंचाई आहे. १०.२६.२६ ची टंचाई अजूनही कायम आहे. यातच जळगाव शहरातील रेल्वे मालधक्क्यावर कार्यरत हमालांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यामुळे मंगळवार (ता.७) ते सोमवार (ता.१३) या दरम्यान जळगाव रेल्वे मालधक्का बंद होता. मागील आठवड्यात खतांचे चार रेल्वे रेक (एक रेक २४०० मेट्रिक टन क्षमता) खते घेवून दाखल होणार होते. परंतु, हे रेक मलकापूर (जि.बुलडाणा) येथील मालधक्क्यावर रिकामे करावे लागले. तेथून अधिकचा वाहतूक खर्च करून जिल्ह्यात खते आणावी लागली.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com