बुलडाण्यात एक लाख ८७ हजार क्विंटल मक्याची खरेदी

यंदाच्या हंगामात शासनाने भरड धान्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात एक लाख ८७ हजार क्विंटल मक्याची खरेदी केली आहे
Purchase of one lakh 87 thousand quintals of maize in Buldana
Purchase of one lakh 87 thousand quintals of maize in Buldana

बुलडाणा ः यंदाच्या हंगामात शासनाने भरड धान्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात एक लाख ८७ हजार क्विंटल मक्याची खरेदी केली आहे. नोंदणी केलेल्या ११ हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे पाच हजार शेतकऱ्यांचाच मका शासनाने निर्धारित वेळेत खरेदी केल्याने उर्वरित शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी दरात मका विकावा लागला आहे.

शासनाने यंदा भरड धान्य योजनेची खरेदी सुरू करताना मका, ज्वारी खरेदीसाठी केंद्र उघडले. ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणीचे आवाहन करण्यात आले. यानुसार जिल्ह्यात ११ हजार ३८७ शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात खरेदी सुरू झाल्यानंतर पणन विभागाने ६०८३ शेतकऱ्यांना मोबाईल संदेश पाठवले. यापैकी ४९९५ शेतकऱ्यांचा १ लाख ८७ हजार क्विंटल मका खरेदी होऊ शकला. शासनाने दिलेला लक्ष्यांक पूर्ण झाल्यानंतर खरेदी बंद करण्यात आली. याचा फटका जिल्ह्यातील हजारो मका उत्पादक शेतकऱ्यांना बसला. नोंदणी केलेल्यांपैकी ५० टक्के शेतकऱ्यांचाच माल शासनाच्या आधारभूत किमतीने खरेदी होऊ शकला.

नोंदणी करूनही खरेदी न होऊ शकलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना त्यांना माल खुल्या बाजारात विकावा लागला. शासनाचा दर १८५० रुपये प्रतिक्विंटल असा होता. खुल्या बाजारात मक्याचा दर १२०० पेक्षा कधीही वर गेला नाही. सध्या तर ११५० ते १२०० दरम्यान व्यापारी खरेदी करीत आहेत.

३५ कोटींची खरेदी शासनाने सुमारे ३५ कोटींची मका खरेदी केली आहे. यापैकी ३० कोटींचे चुकारे शासनाने शेतकऱ्यांना दिले सुद्धा. सध्या केवळ चार कोटी रुपये थकलेले आहेत. ही थकीत रक्कमही काही दिवसांत दिली जाणार आहे.

ज्वारीची ६१ हजार क्विंटल खरेदी मक्यापाठोपाठ जिल्ह्यात ज्वारीही खरेदी करण्यात आली. १५ कोटी ९२ लाख रुपये किमतीची ६११३० क्विंटल ज्‍वारी खरेदी करण्यात आली. या खरेदीपोटी केवळ दोन कोटींचे चुकारे सध्या थकीत आहेत. उर्वरित निधी शेतकऱ्यांना बँक खात्यात वळती करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com