परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दहा लाख क्विंटल कापसाची खरेदी

परभणी ः महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे यंदा परभणी विभागातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत ३४ हजार २२ शेतकऱ्यांच्या १० लाख १ हजार ७२१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.
 Purchase of one million quintals of cotton in Parbhani, Hingoli district
Purchase of one million quintals of cotton in Parbhani, Hingoli district

परभणी  ः महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे यंदा परभणी विभागातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत ३४ हजार २२ शेतकऱ्यांच्या १० लाख १ हजार ७२१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. तब्बल दहा वर्षानंतर यंदा विक्रमी खरेदीचा विक्रम झाला आहे.  

आजवर शेतकऱ्यांना ४७४ कोटी ३६ लाख रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. परभणी विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या संपूर्ण कापसाची खरेदी बुधवार (ता.५) पर्यंत करण्यात आल्यानंतर यंदाची खरेदी कायमस्वरुपी बंद करण्यात आलेली आहे, अशी माहिती पणन महासंघाचे स्थानिक संचालक पंडितराव चोखट, विभागीय व्यवस्थापक अशोक रेणके यांनी दिली.

कोरोना साथीमुळे खाजगी बाजारातील कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या केंद्रांवर कापूस विक्रीस प्राधान्य दिले. कोरोना साथीमुळे खरेदीसाठी सुरुवातीस अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे, स्थानिक संचालक पंडितराव चोखट, पणन महासंघाचे सरव्यवस्थापक जे.पी.महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त जिनिंग फॅक्टरी सुरु करण्यात आल्या. शासनातर्फे कृषी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. नवीन सहा ग्रेडर उपलब्ध झाल्यामुळे खरेदी प्रक्रियेला गती मिळाली.

परभणी जिल्ह्यामध्ये परभणी, गंगाखेड,पाथरी, सोनपेठ या चार आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत लॉकडाऊन पूर्वी फक्त पाच केंद्रप्रमुख ग्रेडरच्या मदतीने १८ हजार ९१५ शेतकऱ्यांचा ५ लाख ३५ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. लॉकडाऊननंतर ऑनलाइन, ऑफलाईन नोंदणी केलेल्या १५ हजार १०७ शेतकऱ्यांच्या ४ लाख ६६ हजार ६८२ क्विंटल कापसाची खरेदी ११ ग्रेडरच्या मदतीने करण्यात आली. आजवर खरेदी केलेल्या कापसापैकी ८ लाख ८९ हजार ५७६ क्विंटल कापसाचे ४७४ कोटी ३६ लाख रुपयाचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. उर्वरित १ लाख १० हजार ४२४ क्विंटल कापसाचे ५६ कोटी ८७ रुपयाचे चुकारे लवकरात लवकर अदा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

लॉकडाऊननंतर ३ मे रोजी पूर्ववत कापूस खरेदी सुरु केल्यानंतर कामगार नसल्यामुळे कापसाचे जिनिंग करण्यास मोठ्या प्रमाणात अडथळे आले. बिगर मोसमी, मोसमी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात कापूस भिजत असल्यामुळे खरेदीकरिता अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्व बाजार समिती मदतीने केंद्रांवर मान्सून शेड उभारण्यात आले. परभणी जिल्ह्यामध्ये वखार महामंडळ गोदामामध्ये गाठी साठवणुकीसाठी जागा नसल्यामुळे खासगी गोदाम भाडेतत्वावर घेऊन उदगीर, अहमदपूर, शिरूर, लोहा, पार्डी या ठिकाणी गाठीची साठवणूक केली. 

पणन महासंघाच्या जिंतूर, गंगाखेड येथील गोदामाची दुरुस्ती करुन तेथे रुईच्या १३ हजार २०० गाठी साठविण्यात आल्या. आजवर रुईच्या २ लाख गाठी तयार झाल्या आहेत. कापूस खरेदी, प्रक्रिया विहीत कालावधीमध्ये पूर्ण करण्यासाठी उपव्यवस्थापक दिलीप मोहीतकर, वाघ, वरिष्ठ ग्रेडर पंजाबराव कदम, मिलींद पुराणकर, लेखापाल दिलीप नखाते आदींनी सहकार्य केले आहे, असे रेणके यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com