खानदेशात कांद्याची कमी दरात खरेदी

खानदेशात कांद्याची कमी दरात खरेदी
खानदेशात कांद्याची कमी दरात खरेदी

जळगाव : खानदेशातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचा कांदा कमी दराने खरेदी केला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर ८५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले, पण जळगाव जिल्ह्यात अपवाद वगळता एवढे दर बाजार समित्या देत नसल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. 

कांदा निर्यात वाढू लागल्याने दरांवरचा दबाव कमी झाला. मागील आठवड्यात दरात क्विंटलमागे ५० ते ८० रुपयांची वाढ झाली होती. कमाल दर ९०० पर्यंत पोचतील, अशी अपेक्षा होती. परंतु चाळीसगाव, धुळे, साक्री, अडावद (ता. चोपडा) व जळगाव येथील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर ६५० रुपयांपुढे नव्हते. चाळीसगाव येथे कमी दरांच्या मुद्यावरून निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी नुकतेच ठिय्या आंदोलन केले. त्याची दखल घेऊन बाजार समितीत अडतदारांनी तब्बल दीडशे रुपये दरवाढ केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

लासलगाव, मनमाड, नांदगाव, उमराणे आदी बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत. असेच दर धुळे, साक्री, दोंडाईचा, अडावद, किनगाव, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथेही असावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

या आठवड्यात जळगाव, चाळीसगाव, धुळे येथील बाजारात केवळ ३५० ते ५५० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत होते. अडतदारांनी मिळून ही कोंडी केली. लिलाव सुरळीत सुरू होते, खरेदी करून कांद्याची पाठवणूक नाशिक, इंदूर व औरंगाबाद भागांत केली जात आहे. अडतदार जादा नफा मिळवीत आहेत. शेतकऱ्यांची मात्र अडवणूक सुरू आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. चाळीसगाव येथे एक बैठकही शेतकऱ्यांसोबत झाली. त्यात दर्जा लक्षात घेऊन कमाल ७०० रुपये दर देण्याचे जाहीर झाल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com