प्रक्रिया उद्योगाकडून खरेदी वाढतेय 

दिवाळीनंतर आवक वाढून दर घसरतील हे स्वप्न पाहणाऱ्या व्यापारी आणि उद्योगांना (प्लांट) शेतकऱ्यांनी आपल्या कृतीतून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हंगाम सुरू होऊन महिना झाला तरी आवक वाढत नाही म्हटल्यावर प्रक्रिया उद्योगाने खरेदी वाढवली आहे.
Purchases from the processing industry are on the rise
Purchases from the processing industry are on the rise

पुणे ः दिवाळीनंतर आवक वाढून दर घसरतील हे स्वप्न पाहणाऱ्या व्यापारी आणि उद्योगांना (प्लांट) शेतकऱ्यांनी आपल्या कृतीतून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हंगाम सुरू होऊन महिना झाला तरी आवक वाढत नाही म्हटल्यावर प्रक्रिया उद्योगाने खरेदी वाढवली आहे. आयात आणि स्थानिक सोयापेंडीच्या दरातील तफावत कमी झाल्याने स्थानिक पेंडीला मागणी वाढली आहे. त्यामुळे सहा हजार रुपये दरानेही सोयाबीन घेऊन प्रक्रिया शक्य होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.  केंद्र सरकारने २१ सप्टेंबरला यंदा देशात १२७.२ लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता. त्यानंतर सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशनने (सोपा) या संस्थेनेही देशातील सोयाबीन उत्पादन ११८.८९ लाख टनांवर स्थिरावले, असे म्हटले आहे. म्हणजेच उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा अधिक राहील, असा सोपाचा अंदाज आहे. मात्र मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत पिकाला पावसाचा ताण, अतिवृष्टी, पूर आणि कीड-रोगामुळे फटका बसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांनी तर त्यांच्या उत्पादनात यंदा निम्म्याने घट झाल्याचे ‘अॅग्रोवन’ला सांगितले. तसेच मध्य प्रदेशातील नीमच, देवास, उज्जैन या भागांत उत्पादनात घट झाल्याचे येथील व्यापारी सूत्रांनी सांगितले. त्यामुळे देशात उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज अनेक जाणकार व्यक्त करत आहेत. 

मागील वर्षी सोयाबीन दराने १० हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. मात्र सरकारने १२ लाख टन जीएम सोयापेंड आयातीला परवानगी दिल्यानंतर दर पाच हजार रुपयांपर्यंत घसरले होते. सोयाबीन दरातील तेजीचा लाभ व्यापारी आणि स्पेक्यूलेटर्स यांनाच झाला. शेतकरी या तेजीपासून उपेक्षित राहिला. त्यातच ऑक्टोबरमध्ये हंगाम सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षीप्रमाणेच आवकेचा दबाव वाढेल, असा अंदाज बांधून व्यापाऱ्यांनी काहीकाळासाठी दर ४५०० रुपयांवरही आणले. सोयाबीनचा दर कोसळेल, बाजार आणखी खाली जाईल, अशी अफवाही सुरू झाली. मात्र शेतकऱ्यांनी भाव पाडण्याचे सर्व डाव पालटून लावले आणि सोयाबीन टप्प्याटप्प्याने विकण्याचा निर्णय घेतला. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल आणि पेंड यांचे दर टिकून राहिले. काही दिवस स्टॉकिस्ट, प्रक्रिया प्लांट्स यांनी खरेदी कमी केली. पण काही केल्या सोयाबीन आवक वाढत नाही आणि दर कमी होत नाही म्हटल्यावर त्यांनी खरेदी सुरू केली. 

दिवाळीनंतरही आवक स्थिर  दिवाळीनंतरही आवक वाढण्याची अपेक्षा धुळीस मिळाल्यानंतर सुधारलेल्या दराने खरेदी सुरू झाली. त्यातच आयात सोयापेंड आणि स्थानिक सोयापेंड यांच्या दरातील फरक कमी झाला. सध्याच्या स्थानिक सोयापेंडचा जो दर आहे, त्या तुलनेत आयात करण्यास परवड नाही. त्यामुळे प्रक्रिया उद्योगांनी सोयाबीन गाळपाला सुरुवात केली. दिवाळीनंतर सोयाबीन दरात ३०० ते ८०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. शेतकरीही टप्प्याटप्प्याने माल विकत आहेत. त्यामुळे सध्या सोयाबीनचे दर साडेपाच हजार ते सहा हजारांच्या दरम्यान आहेत. या दरानेही प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदी वाढविली आहे. त्यामुळे सोयाबीन दर मजबूत स्थितीत आहेत.  सोयाबीन गाळप वाढतेय  लातूर येथील सोयाबीन प्रक्रियादारांनी सांगितले, दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात वाढ झाली. मात्र सोयापेंडचे दरही चांगले आहेत. आयात आणि स्थानिक सोयाबीन पेंडीच्या दरातील तफावत कमी झाल्याने उद्योगाने स्थानिक मालाला पसंती दिली आहे. त्यामुळे वाढलेल्या दरातही सोयाबीन प्रक्रिया परवडत असल्याने प्लांट्सनी खरेदी वाढविली आहे. सध्या दर साडेपाच ते सहा हजार रुपयांवर पोचले, मात्र मागणी असल्याने खरेदीही वाढली आहे  देशभरातील प्रक्रिया प्लांट्सचे दर  महाराष्ट्रातील बेंचमार्क मार्केट असलेल्या लातूर येथे बुधवारी प्लांट्सचे दर प्रति क्विंटल सहा हजार रुपये होते. तर जालना येथेही सहा हजार आणि अकोला येथे ५९०० रुपये प्रति क्विंटलवर होते. तर राजस्थानातील बाराण येथे सहा हजार २५ रुपये आणि कोटा येथेही 

सहा हजार २५ रुपये दर सोयाबीनला मिळाला. तर मध्य प्रदेशातील इंदोर येथील प्रक्रिया प्लांट्सवर सहा हजार ५० आणि नीमच येथेही सहा हजार ५० रुपये दर मिळाला. याचा अर्थ बहुतेक प्रक्रिया प्लांट्सचे दर हे सहा हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.  प्रतिक्रिया 

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आवकेच्या तुलनेत तीन लाख टनाने घट झाली आहे. बाजारात आवक कमी होत असल्याने दरात सुधारणा होत आहे. सोयाबीन आणि सोयाबीन तेलाच्या दरात मागे एकदा मंदी येऊन गेली आहे. सध्या बाजाराची स्थिती बघता जास्त मंदी येण्याची शक्यता नाही. बाजार सध्या असलेल्या दरांच्या दरम्यान फिरत राहील, असे वाटते.  - मोहीत राघव, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी व्यापार इंडिया, उत्तर प्रदेश 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com