दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
ताज्या घडामोडी
सोलापुरात प्रस्थापितांना धक्का
सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी प्रस्थापितांना धक्के बसल्याचे तर अनेक ग्रामपंचायतीवर नवख्या आणि तरुणांनी बाजी मारल्याचे चित्र आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी चुरशीने झालेल्या मतदानानंतर सोमवारी (ता.१८) मतमोजणीत निवडणूक निकालांचे कल हाती आले असून, बहुतांश ठिकाणी प्रस्थापितांना धक्के बसल्याचे तर अनेक ग्रामपंचायतीवर नवख्या आणि तरुणांनी बाजी मारल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील ६७ ग्रामपंचायती आधीच बिनविरोध निवडल्या गेल्या. तर चार ठिकाणच्या निवडणूका रद्द झाल्या, उर्वरित ५९० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. अत्यंत चुरशीने यासाठी मतदान झाले होते. त्यातच राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीमुळे चित्र काय आणि कसे राहील, याची उत्सुकता होती. परंतु गावपातळीवर काही ठराविक गावे वगळता राजकीय पक्षांपेक्षाही स्थानिक गट आणि आघाड्यांमध्ये अधिक लढती रंगल्या.
कुठे भाजप-काँग्रेस युती तर कुठे शिवसेना-राष्ट्रवादी तर कुठे सगळेच पक्ष एकत्र विरुद्ध स्थानिक गट असेही चित्र दिसले. विशेषतः जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अकलूज ग्रामपंचायतीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पॕनेलने १७ पैकी १४ जागा मिळवत बहुमत मिळवले. पण त्यांचे पुतणे संग्रामसिंह मोहिते पाटील पराभूत झाले. त्यांचे दुसरे पुतणे डाॕ. धवलसिंह मोहिते पाटील यांनीच त्यांच्या पॕनेलला आव्हान दिले होते. पण मोहिते पाटील गटाने अर्थात भाजपने तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले.
पंढरपुरात परिचारक गटाने १७ ग्रामपंचायतीवर आघाडी मिळवत आपला झेंडा रोवला, दुसरीकडे मंगळवेढ्यात समाधान आवताडे गटाने १२ ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता मिळवत आपले स्थान बळकट केले. माढ्यात आमदार बबनराव शिंदे समर्थकांनी २३ ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली. दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटमध्ये काँग्रेसने अधिक ग्रामपंचायती मिळवल्या. त्यात भाजपचे आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टींना धक्के बसले. मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील गटाने या आधीच त्यांच्या स्वतः च्या अनगर गावासह वाड्या बिनविरोध करून ताकद दाखवली.
पण त्यानंतरही उर्वरित बहुतांश ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली. बार्शी आणि करमाळ्यात अनेक गावांत प्रस्थापितांना धक्के देत तरुण उमेदवारांनी यश मिळवले. सांगोल्यात माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आपल्या जवळा गावात ११ जागा घेत सत्ता कायम राखली. इथे भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना जेमतेम ४ जागांवर समाधान मानावे लागले. बार्शीतील शेळगाव आर आणि धामणगावात वीस वर्षांनंतर सत्तांतर झाले. उत्तर सोलापुरातील तळेहिप्परगा, कोंडी आणि बीबीदारफळ या गावातही सत्तांतर झाले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांची सुस्ते ग्रामपंचायतींवर ४० वर्षांपासून सत्ता आहे, पण यंदा त्यांना सर्वपक्षीय आघाडीने धक्का देत पराभूत केले.
- सोलापूरमधील निकालावर दृष्टीक्षेप
- १. पन्नास वर्षे बिनविरोध निवडणूक होणाऱ्या मळेगावात सत्ताधारी नर्मेदेश्वर विकास पॕनेल विजयी
- २. अकलूज ग्रामपंचायत पुन्हा विजयसिंह मोहिते पाटलांकडेच, पण पुतण्या पराभूत
- ३. पंढरपूर बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांना धक्का, सुस्ते गावातील ४० वर्षांची सत्ता गेली.
- ४. दक्षिण सोलापुरात आमदार सुभाष देशमुख, अक्कलकोटला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या समर्थकांच्या ग्रामपंचायती विरोधकांकडे
- ५. मोहोळला माजी आमदार राजन पाटलांचा वरचष्मा
- ६. भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना त्यांच्या जवळा गावात अवघ्या चार जागा मिळाल्या.
- कोल्हापुरात स्थानिक आघाड्यांची सरशी
- 1 of 1054
- ››