सोयाबीनच्या वायदा व्यवहारांवर बंदी घाला : सोपाची मागणी

सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने ‘सेबी’ला पत्र लिहीत सोयाबीनच्या ‘एनसीडीईएक्स’मधील वायदे व्यवहारांवर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.
soybean
soybean

नागपूर: सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने ‘सेबी’ला पत्र लिहीत सोयाबीनच्या ‘एनसीडीईएक्स’मधील वायदे व्यवहारांवर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. दरात रोजच्या मोठी सट्टेबाजी होत असल्याने प्रक्रिया उद्योग अडचणीत येण्याची भीती ‘सोपा’ने व्यक्त केली आहे.   सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया (सेबी)च्या पहिल्या अंदाजानुसार देशात १२५ लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला होता.  त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पिकाला पावसाचा फटका बसला. त्यामुळे उत्पादन गेल्या वर्षीच्या ९३.०६२ लाख टनांवरुन १०४.५५ लाख टन होण्याचा सुधारित अंदाज वर्तविण्यात आला. मात्र, व्यापाऱ्यांना सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी होणार असल्याचे वाटते. त्यामुळेच अनेकांनी नव्या हंगामातील सोयाबीनचा साठा करण्यावर भर दिला आहे. यातूनच प्रक्रिया उद्योगांची गरज पूर्ण होत नसल्याने देशात सोयाबीनच्या दरात तेजी अनुभवली जात आहे. 

४००० ते ४२०० रुपयांनी मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. येत्या काळात हे दर ४५०० रुपयांचा पल्ला गाठतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. दरात अशाप्रकारे तेजी येत असतानाच ‘सोपा’ने याचा फटका प्रक्रिया उद्योजकांना बसत असल्याचे ‘सेबी’ला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. दरात दररोज शंभर ते दोनशे रुपये चढ-उतार होत असल्याने प्रक्रिया केलेला माल विकण्याची अडचण निर्माण होते. त्यासोबतच कच्चा माल कोणत्या दराने खरेदी करावा याबाबत अनिश्चितता राहते. ‘एनसीडीईएक्स’ वर कृत्रिम व्यवहारात दर फुगविले जातात. त्याचे परिणाम देखील प्रक्रिया उद्योजक भोगत आहे. त्यामुळे ‘सेबी’ने सोयाबीनच्या ‘एनसीडीईएक्स’वरील व्यवहारांवर तात्पुरती बंदी आणावी, अशी मागणी ‘सोपा’कडून करण्यात आली आहे.  प्रतिक्रिया एनसीडीईएक्स वरील कृत्रिम व्यवहारामुळे दराबाबत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. प्रक्रिया उद्योजकाने प्रक्रिया केलेला माल अशावेळी कोणत्या दराने विकावा हा प्रश्‍न पडतो. व्यापाऱ्यांकडून दर कमी असताना मालाचा साठा केला जातो आणि मालाची टंचाई भासवत दरात तेजी आणली जाते.  यामध्ये प्रक्रिया उद्योजकांचे मोठे नुकसान होत असल्याने सेबीला पत्र लिहीत ‘एनसीडीईएक्स’मधील सोयाबीन व्यवहारावर तात्पुरती बंदी आणण्याची मागणी केली आहे. सध्या सोयाबीनमधील तेजीचा शेतकऱ्यांऐवजी केवळ व्यापाऱ्यांना फायदा होत आहे. - डि.एन. पाठक, कार्यकारी संचालक, ‘सोपा’, इंदूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com