क्यूआर कोड रोखणार हापूसमधील भेसळ 

बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक आंब्यात होणारी भेसळ रोखण्यासाठी भौगोलिक निर्देशांक (जीआय) प्राप्त बागायतदारांना फळावर लावण्यासाठी क्यूआर कोड वितरित करण्यात आले आहे.
 QR code will prevent adulteration in hapus
QR code will prevent adulteration in hapus

रत्नागिरी ः बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक आंब्यात होणारी भेसळ रोखण्यासाठी भौगोलिक निर्देशांक (जीआय) प्राप्त बागायतदारांना फळावर लावण्यासाठी क्यूआर कोड वितरित करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर रत्नागिरीतील दोन बागायतदारांना प्रत्येकी दहा हजार कोड देण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांत क्यूआर कोडचे स्टिकर लागलेली फळं नवी मुंबईतील बाजारात दिसणार आहेत. 

दोन वर्षांपूर्वी कोकणच्या आंब्याला हापूस नावाने भौगोलिक निर्देशांक प्राप्त झालेला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे ग्रामीण या पाच जिल्ह्यांतील आंबा हापूस नावाने बाजारात दाखल होईल. अन्य कोणत्याही आंब्याला हापूस म्हणता येणार नाही. जीआय सर्टिफिकेट कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उपादक विक्रेते सहकारी संस्था, केळशी आंबा उत्पादक संघ, देवगड आंबा उत्पादक संघ आणि कोकण कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत बागायतदारांना दिले जाते. 

आतापर्यंत आठशेहून अधिक बागायतदार, प्रक्रियादार आणि व्यावसायिकांनी हे सर्टिफिकेट घेतले आहे. बाजारपेठेत हापूसचा ब्रॅण्ड विकसित करण्याचा जीआयचा उपयोग होणार आहे. कर्नाटकी आंब्यात होणारी भेसळ रोखण्यासाठी उत्पादक सहकारी संस्थेने पायलट प्रकल्प हाती घेतला आहे. प्रत्येक बागायतदाराला क्यूआर कोड दिला जाणार आहे. तो स्कॅन केला की त्या फळाची सविस्तर माहिती वेबसाइटवरून मिळू शकते. तो कोणत्या शेतकऱ्‍याच्या बागेतून आला आहे, वापरकर्ता कोण, जीआय सर्टीफिकेट आहे का, फळातील न्यट्रिशिअन्स कोणती आहेत याची सविस्तर माहिती त्यात मिळेल. 

क्यूआर कोडचे स्टीकर प्रत्येक फळावर लावण्यात येणार आहे. जेणेकरून कर्नाटक आंब्यात होणारी भेसळ रोखणे शक्य होईल. त्याची अंमलबजावणी येत्या महिन्याभरात केली जाणार आहे. या अंतर्गत रत्नागिरीतील आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे आणि सलील दामले यांना क्यूआर कोड असलेले प्रत्येकी दहा हजार स्टिकर देण्यात आले आहेत. क्यूआर कोडचा स्टीकर लावलेला आंबा दोन दिवसांत नवी मुंबईतील बाजारात दाखल होत आहे. बागायतदार श्री. दामले आणि डॉ. भिडे यांनी त्या पद्धतीने हापूसचे बॉक्स भरले आहेत. 

याबाबत कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उपादक विक्रेते सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे म्हणाले, “यंदा क्यूआर कोडचे १ लाख स्टिकर तयार करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर दहा शेतकऱ्‍यांची निवड केली आहे. त्याची माहिती जीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये फीड केली जाईल. या माध्यमातून अस्सल हापूस कसा ओळखावा हे लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com