गुणनियंत्रण घोटाळ्याची तपास यंत्रणा बदलली

गुणनियंत्रण विभाग
गुणनियंत्रण विभाग

पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तालयातील गुणनियंत्रण विभागातील घोटाळ्याची चौकशी करणारी यंत्रणा तडकाफडकी बदलण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.  नव्या चौकशी यंत्रणेला गैरव्यवहारच नव्हे, तर गुणनियंत्रण विभागाची संपूर्ण कार्यपद्धती शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याबाबत 15 एप्रिलपर्यंत आयुक्तांकडे गुणनियंत्रण विभागातील घोटाळा, अधिकाऱ्यांची भूमिका, सुधारणा आणि कार्यपध्दती असा सविस्तर अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.  “गुणनियंत्रण घोटाळ्यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट आरोप झालेले आहेत. या आरोपांच्या अनुषंगाने चौकशी सुरू होती. मात्र, चौकशी यंत्रणा बदलण्याबाबत आस्थापना विभागाने कोणतीही शिफारस केलेली नव्हती,’’ असे आस्थापना विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दक्षता पथकाचे प्रमुख किसनराव मुळे यांच्याकडून चौकशी काढून घेतली आहे. आता कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक विजयकुमार घावटे यांच्याकडे गुणनियंत्रण घोटाळ्याची चौकशीची सूत्रे देण्यात आली आहेत, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. 

“आम्हाला चौकशी करण्याचे आदेश मिळाले आहेत. तथापि, अजून घोटाळ्याच्या अनुषंगाने एकही फाईल मिळालेली नाही. मुळात नियोजन विभागाचा गुणनियंत्रण विभागाशी काहीही संबंध नसतो. तसेच, तांत्रिक माहितीदेखील पूर्णतः मिळालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात प्रथमदर्शन कोण दोषी आहे हे आताच सांगता येणार नाही,’’ असे नियोजन विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण विभाग हा ‘वसुली विभाग’ म्हणून निविष्ठा उद्योगात प्रसिध्द आहे.  परवाने वाटण्यासाठी मलिदा घेणे, तसेच खते, बियाणे, कीटकनाशक उत्पादनांवर धाडी टाकणे, ‘स्टॉपसेल’ देणे, प्रयोगशाळेचे सॅम्पल ‘मॅनेज’ करणे अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी या विभागाच्या विरोधात आहेत. 

“नियोजन संचालक विजयकुमार घावटे यांनी गुणनियंत्रण विभागाच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करावा. वृत्तपत्रातील कात्रणे, तक्रार अर्ज यात नमुद करण्यात आलेल्या मुद्द्यांची देखील चौकशी करावी, असेही आयुक्तांनी सूचविले आहे. विशेष म्हणजे आयुक्तांनी केवळ घोटाळा शोधून थांबून नका तर त्यावर उपायदेखील सूचवा,’’ अशी भूमिका घेतली आहे. 

“गुणनियंत्रण विभागाची कार्यपध्दती पारदर्शक होण्यासाठी आयुक्तांनी सुरवातीपासून पाठपुरावा सुरू केला आहे. त्यासाठी विद्यमान संचालक विजयकुमार इंगळे व मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुभाष काटकर यांच्याशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली आहे. या विभागात पारदर्शकता आणण्यासाठी श्री. घावटे यांनीदेखील नवी कार्यपध्दती सूचवावी असे आदेश आयुक्तांनी दिले आहे,’’ असे सूत्रांनी नमूद केले.  आयुक्तांनी घेतली ठाम भूमिका  गुणनियंत्रण विभागाच्या कामकाजाबाबत थातूरमातूर चौकशी होण्याची शक्यता वाटत होती. तथापि, आयुक्तांनी ठाम भूमिका घेत चौकशीच्या कक्षादेखील ठरवून दिल्या आहेत. खते व बियाणे उत्पादक संघटनेकडून आलेल्या तक्रारींची सखोल चौकशी करावी व तक्रारीत नमूद केलेल्या प्रकरणांची चौकशी करावी. या चौकशीत भ्रष्टाचार आढळल्यास त्याला दोषी कोणता अधिकारी किंवा कर्मचारी आहे हे देखील तपासून त्यांच्यावर आरोप निश्चित करून आमच्याकडे पाठवा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com