पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेपर्यंत कर्जमाफी योजना सुरू राहणार : सहकारमंत्री देशमुख

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  ः सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरूच राहील, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी (ता. २१) विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. 

शिवसेनेचे किशोर दराडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेल्या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याचा आरोप केला. देशमुख यांनी यावर बोलताना एकही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही दिली. राज्यातील ८९ लाख पात्र शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची ही योजना आहे. आतापर्यंत ५० लाख ३४ हजार शेतकऱ्यांना २४ हजार १०१ कोटी रुपयांच्या कर्जमाफीला मान्यता मिळाली असून, त्यापैकी १८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती देशमुख यांनी या वेळी दिली.  

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कमी बाजारभाव मिळत असल्याचा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता, या प्रश्नाला उत्तर देताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कांद्याच्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी कांदा किंमत स्थिर योजनेअंतर्गत नाफेडकडून ५० हजार टन कांदा खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. भविष्यात जर कांद्याचा प्रश्न निर्माण झाला तर सरकार हस्तक्षेप करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार देईल असे आश्वासन त्यांनी दिले.

पहिल्या टप्प्याचे कांद्याचे अनुदान दिले आहे, पुरवणी मागण्या मान्य झाल्यानंतर प्रलंबित अनुदान एका महिन्याच्या आत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कांदा निर्यात अनुदान पुन्हा सुरू करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राला केली असून यावर एका आठवड्यात सकारात्मक निर्णय होईल असे श्री. खोत यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com