पालकमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने प्रश्‍न प्रलंबितच

पालकमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने प्रश्‍न प्रलंबितच
पालकमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने प्रश्‍न प्रलंबितच

जळगाव :महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोमवारी (ता.२८) नियोजित जिल्हा दौरा अचानक रद्द झाल्याने शेतकरी, ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. जिल्ह्यातील कळीचे मुद्दे आता लोकसभा निवडणुकीपूर्वी सुटणे शक्‍य दिसत नसल्याच्या प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. 

पालकमंत्री पाटील यांच्याकडे महत्त्वाचे विभाग आहे. त्यांच्याकडून अपेक्षा अधिक आहेत. परंतु जिल्ह्याचे प्रश्‍न उन्हाळा सुरू होण्यापूर्वीची शक्‍यताही धूसर झाली आहे. हतनूर धरणातून शेतीसाठी पाण्याची मागणी प्रशासनाने नामंजूर केली आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांची भेट घेण्याची तयारी यावल, चोपडामधील शेतकऱ्यांनी केली होती. पालकमंत्र्यांनी दौऱ्यामध्ये नियोजन समितीची बैठक न घेता अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेण्याचे नियोजनही केले होते. परंतु, हा आढावादेखील आता घेतला जाणार नाही. 

जिल्ह्यात चिखली-नवापूर यादरम्यानच्या महामार्गाच्या चौपदरीकरणासंबंधी कार्यवाही धिम्या गतीने सुरू आहे. यातील तरसोद ते फागणे या सुमारे १०० किलोमीटर अंतराचे काम बंदावस्थेत आहे. औरंगाबाद-जळगाव मार्गाच्या रुंदीकरणाचे कामही संथ गतीने सुरू आहे. तसेच इतर राज्यमार्गांच्या कामांना गती देण्याची मागणीदेखील होत आहे. कांद्याचा प्रश्‍न खानदेशात गंभीर असून, अलीकडेच शेतकऱ्यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत कांदे वाटप केले. 

कांदा अनुदान कमी आहे. सध्या दर कमी अधिक होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कापसाचे फरदड पीक गुलाबी बोंड अळीने पूर्णतः किंवा १०० टक्के नष्ट झाले आहे. या सगळ्या स्थितीत शेतकऱ्यांना पालकमंत्री पाटील यांची भेट घ्यायची होती. परंतु, दौरा रद्द झाल्याने आता कुठलेही प्रश्‍न सुटणार नाहीत, असे शेतकऱ्यांमध्ये चर्चिले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com