अकोला : केंद्रीय पथकाची धावती भेट आटोपली

केंद्रीय पथकाची धावती भेट आटोपली
केंद्रीय पथकाची धावती भेट आटोपली

अकोला ः विभागात परतीच्या व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या कापूस विकास संचालनालयाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर. पी. सिंग यांच्या पथकाने अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तीन जिल्ह्यांत धावती भेट देऊन पाहणी केली.

हा दौरा आटोपला असून, आता ते काय अहवाल देतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. डॉ. सिंग यांच्या पथकाने शनिवारी (ता. २३) अकोला तालुक्यातील म्हैसपूर येथून पाहणीला सुरवात केली. 

हे पथक कापशी तलाव, गोरेगाव खुर्द, बाळापूर तालुक्यात भरतपूर, नकाशी येथे पाहणी केली. त्यानंतर हे पथकाने बुलडाणा जिल्ह्यात कलोरी, टेंभूर्णा, सुटाळा, भादोला येथे भेट देऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली.  रविवारी (ता. २४) या पथकाने सर्वप्रथम सव गावापासून पाहणीला सुरवात केली. त्यानंतर चिखली तालुक्यातील केळवद, हातणी, गांगलगाव, आमखेड, मेहकर तालुक्यांतील नागझरी, दादुलगव्हाण, गणपूर येथे पाहणी केली. 

शेतकरी प्रतिक्रिया...

नंतर पथकाने वाशीम जिल्ह्यात रिसोड तालुक्यातील महागाव, बाळखेड, वाशीम तालुक्यांतील नागठाणा, वांगी येथे भेट दिली.  दोन दिवसांच्या दौऱ्यात पथकाने २२ पेक्षा अधिक ठिकाणी जाऊन धावती भेट दिली. दौऱ्यादरम्यान खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन आवक झालेल्या सोयाबीन व इतर धान्याचीही पाहणी केली. पथकाच्या दौऱ्यामुळे महसूल, कृषी विभागाच्या यंत्रणांची एकच पळापळ झाली. विभागीय आयुक्त पीयूष सिंग, कृषी सहसंचालक सुभाष नागरे हे पूर्णवेळ होते. पथकाने सविस्तरपणे अहवाल द्यावा, तसेच केंद्राने तातडीने मदत करावी, अशी मागणी आता शेतकरी या निमित्ताने करीत आहेत.

माझ्या शेतात यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भेट दिली होती. त्यानंतर हे पथकही भेट देऊन गेले. अद्याप कुठलीही ठोस मदत मिळालेली नाही. शासनाने तातडीने दिलासा देणारी मदत केली पाहिजे, तरच या भेटींचा उद्देश सफल झाल्यासारखे वाटेल. आज शेतात उभे दिसणारे पीक कापण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसे नाहीत. - गजानन अडकने, म्हैसपूर, जि. अकोला

शेतकरी या वर्षी मोठ्या संकटात आलेला आहे. गेले वर्ष दुष्काळात गेले. यंदा खरीप चांगला दिसत असताना अतिपावसाने नुकसान झाले. केंद्राचे पथक या नुकसानीची पाहणी करून गेले असून, वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा व केंद्राने तातडीने मदत करावी. - डॉ. प्रकाश मानकर, अध्यक्ष, महाराष्‍ट्र भारत कृषक समाज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com