‘रासाका`, ‘निसाका`साठी लढा देणार ः खासदार शेट्टी

‘रासाका`, ‘निसाका`साठी लढा देणार ः खासदार शेट्टी
‘रासाका`, ‘निसाका`साठी लढा देणार ः खासदार शेट्टी

सायखेडा, जि. नाशिक : शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, साखर कारखाने आणि शेतीविषयक धोरणामुळे आज ऊस उत्पादक शेतकरी वर्गाची वाताहात झाली आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, त्यांचा सात बारा कोरा करावा अन्यथा शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणणाऱ्या राजकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. तसेच `रासाका`, `निसाका`साठीही संघटना रस्त्यावर उतरून लढा देणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

करंजगाव येथे गुरुवारी (ता.२७) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कांदा, ऊस, द्राक्ष परिषदेचे आयोजन केले होते. त्या वेळी खासदार शेट्टी बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष रवींद पोकळे, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष हंसराज वडघुले, महिला आघाडीच्या अध्यक्षा रसिका ढगे, करंजगावच्या सरपंच सोनाली राजोळे उपस्थित होते.

या वेळी श्री. शेट्टी म्हणाले, की निफाड सहकारी साखर कारखाना आणि रानवड कारखान्याला स्वतंत्र पॅकेज द्यावे. सभासद आणि कामगारांचे थकीत बिल सरकारने त्वरित द्यावे. कांद्याला २००० हजार रुपये हमीभाव मिळाला पाहिजेत. दुधाचे दर निश्चित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना मिळावेत. हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकरी संघटना कटिबद्ध आहे. बंद कारखाने सुरू करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. जर असे होणार नसेल तर एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही. सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्रासच देत आहे. तसेच विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चालवण्यासाठी घेतलेल्या रानवड साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचे पैसे थकवले आहे यांना जाब कोण विचारणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर पैसे दिले नाही तर विधानसभेवर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येईल.

स्वाभिमानी संघटनेचे युवा अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी मार्गदर्शन केले. या वेळी दूध आंदोलनादरम्यान तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रदेश महिला अध्यक्ष रसिका ढगे, प्रांतिक अध्यक्ष साहेबराव मोरे, प्रांतिक सदस्य दीपक पगार, चंद्रकांत बनकर, माजी आमदार दिलीप बनकर, माणिक बोरस्ते, संदीप जगताप, साहेबराव मोरे, जिल्हा परिषदेचे सदस्य यतीन कदम, सुरेश कमानकर, पंचायत समिती सदस्य कमल राजोळे, सरपंच सोनाली राजोळे, खंडू बोडके पाटील, शहाजी राजोळे, आत्माराम पगार, सागर जाधव वसंत जाधव, वैभव देशमुख, प्रकाश चव्हाण, निवृत्ती गारे, अनिल मुंदडा, सोमनाथ कोरडे, माणिक कदम, सुधाकर मोगल, नाना बच्छाव, भाऊसाहेब ओहळ आदी उपस्थित होते.

परिषदेतील ठराव असे...

  •  संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. सातबारा कोरा झाला पाहिजे
  •  कांद्याच्या निर्यातीबाबत सकारात्मक धोरण अवलंबावे. दोन हजार रुपये हमीभाव द्यावा.
  •  निफाड आणि रानवड सहकारी साखर कारखाना यांना स्वतंत्र पॅकेज देऊन हे कारखाने सुरू करावेत.
  •  पणन मंडळाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व्यापाऱ्यांवर     बंधने घालावीत.
  •  द्राक्षाचा काटला बंद करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी.
  •  जगातील बहुतांशी देशात द्राक्ष निर्यात खुली करावी
  •  द्राक्षावर आधारित पूरक व्यवसाय सुरू करावे
  •  शेतीतील सर्व घटकांवरील जीएसटी तात्काळ मागे घ्यावी.
  •  जिल्हा बॅंकेने सक्तीची कर्जवसुली थांबावी, धनदांडग्यांकडून वसुली करावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com