मराठवाड्यात थंडीअभावी रब्बीवरही संकटाचे ढग

खरीप हातचा गेला. रब्बीत टोमॅटो खरबूज, कांदे, गहू पेरला. दीड महिन्यापासून या पिकांवरील संकट संपण्याची नाव घेईना. टोमॅटोवर मावा, खरबुजावर करपा, कांद्यावर मावा व थ्रीप्स, गव्हावर मावा वाढलाय. थंडीच्या अचानक येण्या-जाण्यामुळे फवारण्या वाढून उत्पादन खर्च वाढला. - संदीप गवळी, भाजीपाला उत्पादक, माळीवडगाव जि. औरंगाबाद. रब्बीत १० एकर हायब्रीड ज्वारी अन् ६ एकर मका पेरला. ज्वारीवर मावा, तर मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला. वातावरण पोषक नसल्याने आठवड्याला एक फवारणी ठरलेली. मोसंबीवरही पाने कुरतडणारी अळी आली. ज्या पिकांवर औषध फवारण्याची गरज नव्हती. त्यावर फवारण्याची वेळ आली. - राहुल गिरी, शेतकरी निंबायती, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद. हे वातावरण रब्बी पिकांसह फळपिकांवर संकट घेऊन आले. ज्वारी, मोसंबी, डाळिंबावर मावा व चिकट्याचा प्रादुर्भाव आहे. हरभऱ्यावर घाटे अळीचा, तर आंब्यावर मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला. पक्‍व ज्वारीवर फवारणी शक्‍य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत फवारणी घ्यावी. - प्रा. अजय मिटकरी, कीटकशास्त्रज्ञ, केव्हीके खरपुडी जि. जालना. हरभऱ्यावर घाटे अळीच्या नियंत्रणासाठी फवारणी करताना क्‍लोरोपायरीफॉस २० मिली अधिक २०० ग्रॅम डीएपी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास घाटे अळीवर नियंत्रण मिळून घाट्याचे वजन वाढण्यास मदत होईल. - डॉ. किशोर झाडे, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके औरंगाबाद.
The rabbi also crises without cold in Marathwada
The rabbi also crises without cold in Marathwada

औरंगाबाद : सुरुवातीपासून नैसर्गिक संकटांच्या सुरू असलेल्या मालिकेमुळे रब्बी पिकांसह फळपिकांची परवड होत आहे. त्यामुळे आधी खरीप हातचा गेल्यानंतर रब्बी तरी आधार देईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. ती आता संकटात सापडली आहे. 

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण १९ लाख १९ हजार ५१६ हेक्‍टरच्या तुलनेत २४ लाख २ हजार ९०७ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली. यामध्ये औरंगाबाद विभागातील ९ लाख ४९ हजार ८२९ हेक्‍टरसह लातूर कृषी विभागांतर्गत १४ लाख ५३ हजार ७८ हेक्‍टरवरील पिकांचा समावेश आहे. खरीप हातचा गेल्यानंतर सर्व आशा रब्बीवर अवलंबून आहे. आधी जमिनी तयार करायला अवधी गेला आणि आता वातावरण पोषक नसल्याने पिकंही अडचणीत आहेत. 

पिकांना अपेक्षित कालावधीत थंडी मिळाली नाही. त्यामुळे ज्वारी, गहू, भाजीपाला, मका, मोसंबी, डाळिंब आदी फळपिकांवरील संकट कायम आहे. ज्वारी, गहू या धान्यपिकांसह मोसंबी, डाळिंब या फळपिकांवर, भाजीपाल्यातील टोमॅटो, कांदा आदी पिकांवर माव्याचा प्रादुर्भाव वाढतो आहे. आंब्यावरही मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

जिल्हानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

औरंगाबाद २ लाख ३९ हजार ९४०
जालना २ लाख ७९ हजार २१६
बीड ४ लाख ३० हजार ६७३ 
लातूर ३ लाख ४१ हजार ४०८
उस्मानाबाद  ४ लाख २७ हजार ४४९
नांदेड २ लाख ७३ हजार १५०
परभणी २ लाख ५३ हजार ६३७ 
हिंगोली १ लाख ५६ हजार ६३४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com