नांदेड जिल्ह्यातील रब्बी क्षेत्रात दीडपटीहून अधिक वाढ

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी रब्बीतील नियोजनासाठी तीन बैठका घेतल्या. खते, बियाणे पुरवठा, वीजपुरवठा, सिंचन सुविधा देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यामुळे यंदा रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली. गव्हाची पेरणी सुरू आहे. त्यामुळे पेरणीत आणखीन वाढ होईल. - रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.
Rabbi area increased by more than one and a half in Nanded district
Rabbi area increased by more than one and a half in Nanded district

नांदेड : ‘‘यंदाच्या रब्बी हंगामात पुरेशा प्रमाणात सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्यामुळे जिल्ह्यातील रब्बीच्या पेरणी क्षेत्रात दीडपटीहून अधिक वाढ झाली आहे. जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३६ हजार ७१२ हेक्टर आहे. यंदा गुरुवार(ता. २६)अखेर २ लाख १४ हजार ६१० हेक्टरवर म्हणजेच १५६.९८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अद्याप पेरणी सुरू आहे. त्यामुळे रब्बीच्या पेरणी क्षेत्रात आणखीन भर पडणार आहे’’, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगितले.

जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३६ हजार ७१२ हेक्टर आहे. यामध्ये ज्वारीचे २६ हजार ९७५ हेक्टर, गव्हाचे ३८ हजार ५३८ हेक्टर, मक्याचे ३ हजार १७८ हेक्टर, हरभऱ्याचे ६२ हजार ३४९ हेक्टर, करडईच्या ४ हजार ७६८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांमध्ये एकूण २ लाख १४ हजार ६१० हेक्टरवर १५६.९८ टक्के पेरणी झाली आहे.

अन्नधान्य आणि चारा पीक म्हणून शेतकऱ्यांनी पसंती दिल्यामुळे ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली. ज्वारीने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा ओलांडला आहे. रब्बीतील प्रमुख नगदी पीक असलेल्या हरभऱ्याला यंदा शेतकऱ्यांनी सर्वात अधिक प्राधान्य दिले. त्यामुळे आजवर हरभऱ्याची १ लाख ५७ हजार १७३ हेक्टरवर म्हणजेच २५२.०९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गव्हाची ६० टक्क्यांच्या जवळपास पेरणी झाली. करडईचे क्षेत्रात गतवर्षी प्रमाणेच यंदाही घट कायम आहे. आजवर ३८.०७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

जिल्ह्यातील १३ तालुक्यांनी सर्वसाधारण पेरणी क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी झालेल्या तालुक्यांमध्ये नांदेड, अर्धापूर, हदगाव, माहूर, किनवट, भोकर, उमरी, धर्माबाद, नायगाव, बिलोली, देगलूर, कंधार, लोहा या तालुक्यांचा समावेश आहे. मुदखेड, हिमायतनगर, मुखेड या तीन तालुक्यांत सर्वधारण क्षेत्रापेक्षा कमी पेरणी झाली  आहे.

पीकनिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये  

पीक  सर्वसाधारण क्षेत्र  पेरणी क्षेत्र टक्केवारी
ज्वारी २६९७५  २८०५९  १०४.०२
गहू ३८५३८  २२१७०   ५७.५३
मका ३१७८ २६४६ ८३.२६
हरभरा ६२३४९  १५७१७३  २५२.०९
करडई  ४७६८ १८१५ ३८.०७
सूर्यफूल  ९४ ४    ४.२६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com