संग्रहित चित्र
संग्रहित चित्र

धुळे जिल्ह्यात रब्बी पीककर्ज वितरण शून्य टक्के

धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला खरिपात पीककर्ज वितरणाचा अधिक लक्ष्यांक असतो. यामुळे रब्बी पीककर्जाचा कोणताही लक्ष्यांक धुळे-नंदुरबार जिल्हा बॅंकेला नाही. परंतु राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व खासगी बॅंकांना जो लक्ष्यांक दिला, त्यातून त्यांनी कुठलेही रब्बी पिकांसंबंधीचे कर्ज वितरित केलेले नाही. यासंदर्भात लवकरच नियमानुसार प्रशासन आपली कार्यवाही करील. - जे. के. ठाकूर, जिल्हा उपनिबंधक, धुळे.

जळगाव  ः खानदेशात खरिपात जसे बॅंकांनी पीककर्जासाठी शेतकऱ्यांना वणवण फिरविले, तसाच प्रकार रब्बी हंगामातही सुरू आहे. राष्ट्रीयीकृत बॅंका, तर शेतकऱ्यांना दाराशी उभे करायलाही तयार नाहीत. पीककर्ज म्हणजे बुडीत कर्ज, असे गृहीत धरून राष्ट्रीयीकृत बॅंकांनी शेतकऱ्यांना मुख्य शाखेत जा आणि कर्जाचे काय तेथे बघा, असा सल्ला देण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे पीककर्ज वितरणाचा लक्ष्यांक अपूर्णच आहे. जळगाव जिल्ह्यात सर्व बॅंकांनी मिळून २५५ कोटी ९९ लाख रुपयांच्या लक्ष्यांकापैकी १७ कोटी ४० लाखांचे पीककर्ज वितरित केले आहे. धुळे - नंदुरबार जिल्हा सहकारी बॅंकेला रब्बी पीककर्ज वितरणाचा कोणताही लक्ष्यांक नाही. दुसऱ्या बाजूला जिल्हा बॅंक वगळता अन्य बॅंकांना धुळे जिल्ह्यात १५७ कोटी ७८ लाख रुपये कर्ज वितरण लक्ष्यांक असून, यातून शून्य टक्के कर्जाचे वितरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

धुळे जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांना १३९ कोटी ४३ लाख, ग्रामीण बॅंकांना तीन कोटी नऊ हजार, खाजगी बॅंकांना १५ कोटी ८६ लाख कर्ज वितरणाचा लक्ष्यांक दिला आहे. यापैकी कुठलेही पीककर्ज रब्बीसाठी वितरित झालेले नसून, वितरण लक्ष्यांक शून्य टक्के आहे.

जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ९६.८६ कोटी रुपये लक्ष्यांकापैकी पाच कोटी ४३ लाख, राष्ट्रीयीकृत बॅंकांनी १३१.०१ कोटी रुपयांपैकी तीन कोटी ५० लाख रुपये, ग्रामीण बॅंकांनी २ कोटी ४० लाखांपैकी ९७ लाख, खाजगी बॅंकांनी २६.६२ कोटी रुपयांपैकी फक्त ७ कोटी ५० लाख रुपयांचे रब्बी पीककर्ज वितरित केले आहे.

जळगाव जिल्ह्यात या महिन्याच्या सुरवातीपर्यंत फक्त ६.८० टक्के रब्बी पीककर्ज वितरित झाल्याची माहिती प्रभारी सहायक जिल्हा उपनिबंधक अशोक बागल यांनी दिली. खरिपात खानदेशात पीककर्ज वितरणाचा लक्ष्यांक ४५ टक्केही गाठला गेला नव्हता. आता रब्बीत हा लक्ष्यांक २० टक्केही गाठला जाणार नाही, असे चित्र तूर्त तरी आहे.   मी अलीकडेच शेती खरेदी केली असून, त्यात केळी लागवड केली आहे. त्यावर पीककर्ज हवे आहे. केळीची रब्बी हंगामात लागवड केली असल्याने रब्बी पीककर्जासंबंधी जळगाव शहरातील एका राष्ट्रीयीकृत बॅंकेत कर्ज मागणीचा प्रस्ताव दिला. परंतु बॅंक कर्जासंबंधी स्पष्टपणे सांगत नाहीत , असे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी  रामदास काळे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com