सातारा जिल्ह्यात दहा टक्क्यांवर रब्बी क्षेत्र राहिले नापेर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः जिल्ह्यातील रब्बी हंगाम पेरणीचा कालवधी संपला आहे. जिल्ह्यात बुधवारअखेर (ता.२६) ८९.७१ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. पाणीटंचाईमुळे रब्बीतील दहा टक्क्यांवर क्षेत्र नापेर राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या अहवालप्रमाणे हंगामात कोणत्याही पिकांची सर्वसाधारण क्षेत्राइतकी पेरणी झालेली नाही. दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या माण तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. पाणीटंचाईमुळे या तालुक्यातील पिके सुकून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे दोन लाख १४ हजार ८२३ हेक्‍टर असून, त्यापैकी (ऊस वगळून) एक लाख ९२ हजार ७१४ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ८९.७१ टक्के पेरणी झाली आहे. रब्बी हंगामातील प्रमुख असलेल्या रब्बी ज्वारीची यंदा सर्वाधिक पेरणी झाली आहे. 

रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३९ हजार १११ हेक्‍टर असून, त्यापैकी एक लाख २५ हजार ९३१ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ९०.५३ टक्के पेरणी झाली आहे. गहू पिकाचे ३४ हजार ४७३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, गव्हाची ३० हजार १५२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ९४१ हेक्‍टर असून, दहा हजार २०६ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.  हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८८३ हेक्‍टर असून, त्यापैकी २५ हजार ४५८ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळाच्या झळा जाणवत असल्यातरी पश्चिम भागात पाण्याची स्थिती बरी असल्याने पिकांची अवस्था चांगली आहे.

तालुकानिहाय पेरणीक्षेत्र (हेक्‍टर) ः सातारा १६,३६९, जावली ६,२३५, पाटण १३,४५५, कऱ्हाड १४,५८३, कोरेगाव २२,७१६, खटाव २३,९५५, माण ४०,६९७, फलटण २५,५०१, खंडाळा १४,८३३, वाई १३,९१५, महाबळेश्वर ४५५.    उत्पादनात होणार घट  रब्बी हंगामातील पेरणीचा कालवधी संपला असल्याने पेरणीची कामे बंद झाली आहे. जिल्ह्यात कृषी विभागाकडून रब्बीसाठी सर्वसाधारण क्षेत्र निश्चित केले होते. या क्षेत्रापैकी १०.२९ टक्के क्षेत्र नापेर राहिल्याचे आकडेवारी स्पष्ट होत आहे. नापेर क्षेत्र व सध्या असलेली तीव्र पाणीटंचाई यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com