लातूर विभागात रब्बीत बारा लाख हेक्‍टरवर पिके

लातूर विभागात रब्बीत बारा लाख हेक्‍टरवर पिके
लातूर विभागात रब्बीत बारा लाख हेक्‍टरवर पिके

लातूर : लातूर कृषी विभागांतर्गत लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांत रब्बीची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ११२ टक्‍के पेरणी झाली आहे. पाचही जिल्ह्यांत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १२ लाख १४ हजार २३० हेक्‍टर आहे. प्रत्यक्षात १२ लाख ५३ हजार ९३८ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. 

पाचही जिल्ह्यांत पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये लातूर जिल्ह्यातील ३ लाख ३३ हजार ७८० हेक्‍टर क्षेत्रासह उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ लाख ३३ हजार ८३१ हेक्‍टर, नांदेडमधील २ लाख ३३ हजार ८०० हेक्‍टर, परभणीमधील २ लाख ५६ हजार १६४ हेक्‍टर, तर हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ४ हजार १३१ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. या पाचही जिल्ह्यांतील खरिपाचे २९ लाख १५ हजार २८० हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र आहे.

२०१९ च्या खरीप हंगामात प्रत्यक्षात २७ लाख ३२ हजार ६७८ हेक्‍टर अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९४ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली. खरिपात केवळ उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली, तर उर्वरित जिल्ह्यांत ती सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८६ ते ९१ टक्‍क्‍यांच्या दरम्यान होती.

लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांत ३ लाख ४८ हजार ८७६  हेक्‍टरवर ज्वारीचे पीक आहे. त्यात लातूर जिल्ह्यातील ४२८१७ हेक्‍टर क्षेत्रासह उस्मानाबाद जिल्ह्यातील १ लाख ४० हजार ९२७ हेक्‍टर, नांदेड २८ हजार ६७१ हेक्‍टर, परभणी १ लाख ३१ हजार २६९ हेक्‍टर, तर हिंगोली जिल्ह्यातील ५१९२ हेक्‍टर ज्वारी क्षेत्राचा समावेश आहे. 

हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव

लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. परभणी, हिंगोली व नांदेड या तीनही जिल्ह्यांत हरभऱ्याचे पीक घाटे लागण्याच्या व पक्‍वतेच्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे.

अमेरिकन लष्करी अळीने पोखरली ज्वारी 

पाचही जिल्ह्यात उगवण, वाढीच्या ते फुलोऱ्याच्या अवस्थेत ज्वारीचे पीक आहे. उस्मनाबाद जिल्ह्यात तिचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८७ हजार १९१ हेक्‍टर आहे. प्रत्यक्षात १ लाख ४० हजार ९२७ हेक्‍टरवर ज्वारीची पेरणी झाली. पोटरी ते फुलोरा अवस्थेत असलेल्या या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. नियंत्रणासाठी अंडी घातलेली पाने नष्ट करणे, एकरी ५ कामगंध सापळे लावणे, इमामेक्‍टीन बेन्झोएट ५ टक्‍के ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com