परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम विमा परतावा देण्याचे आदेश

परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा विमा परतावा मिळणार
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा विमा परतावा मिळणार

परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे रब्बी ज्वारीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित आहे. त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत जिरायती क्षेत्रावरील रब्बी ज्वारीसाठी विमा संरक्षण घेतलेल्या आठ तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर २५ टक्के अग्रीम विमा परतावा जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी अधिसूचनेद्वारे दिले आहेत. या संदर्भात कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

दरम्यान, परभणी तालुक्यातील रब्बी ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात ७५ टक्के पेक्षा अधिक घट झाल्यामुळे जिरायती क्षेत्रातील ज्वारी पिकांसाठी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्क्यांपर्यंत नुकसानभरपाई देण्याचे आदेश महिनाभरापूर्वी दिलेले आहेत. सोमवारी (ता. ११) उर्वरित आठ तालुक्यांतील अधिसूचित मंडळांतील विमा संरक्षित रब्बी ज्वारीचा २५ टक्के अग्रीम परतावा देण्याचे आदेश दिल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिरायती क्षेत्रावरील विमा संरक्षित ज्वारीचा अग्रीम परतावा मिळू शकणार आहे.

गतवर्षी (२०१८) च्या पावसाळ्यामध्ये जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे रब्बी पिकांच्या पेरणीसाठी जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नव्हता. अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्यावर पेरणी केली, परंतु त्यानंतर वाढीच्या तसेच परिपक्वतेच्या अवस्थेत पाणी मिळाले नाही. पीकविमा योजनेअंतर्गतच्या निकषानुसार हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ नुकसानभरपाई रक्कम देण्याची तरतूद आहे. परभणी जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत रब्बी ज्वारी (जिरायती) या अधिसूचित पिकांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये हंगामातील दुष्काळी परिस्थिती आणि पावसातील खंड या प्रातिनिधिक वस्तुस्तितीवरून सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे दिसून येत आहे. 

त्यामुळे जिल्ह्यातील जिंतूर आणि सावंगी - म्हाळसा मंडळ गट, बामणी बु. आणि चारठाणा मंडळ गट, आडगांव बाजार आणि बोरी मंडळ गट, सेलू आणि देऊळगाव गात मंडळ गट, वालूर आणि कुपटा मंडळ गट, चिकलठाणा बु. मंडळ, मानवत, केकरजवळ, कोल्हा, पाथरी, बाभळगांव हदगांव बु., सोनपेठ, आवलगाव, गंगाखेड, महातपुरी, राणीसावरगाव, माखणी, पालम, चाटोरी अधिक बनवस मंडळगट, पूर्णा, ताडकळस आणि लिमला मंडळगट, कात्नेश्वर, चुडावा या अधिसूचित मंडळातील रब्बी ज्वारीसाठी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्क्यांपर्यंत नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सादर केला होता.

जिल्ह्यात ४७ टक्के ज्वारीची पेरणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७८ हजार ४७८ हेक्टर आहे. परंतु यंदाच्या (२०१८-१९) ८३ हजार ९७० हेक्टरवर (४७.०५ टक्के) ज्वारीची पेरणी झाली. पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ६१ हजार ३३२ शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर केले असून, ४ कोटी १६ लाख रुपये विमा हप्ता भरला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com