खानदेशात रब्बी मका लागवड

खानदेशात रब्बी मका लागवड सुरू
खानदेशात रब्बी मका लागवड सुरू

जळगाव : खानदेशात ऑक्‍टोबर महिन्यात मका, ज्वारी, केळी पिकावर वाढलेले लष्करी अळीचे संकट काहीसे कमी झाले आहे. यामुळे पुन्हा मका लागवड बागायती पट्ट्यात सुरू झाली आहे. नोव्हेंबरमध्ये पेरणी केलेली बागायती ज्वारी, हरभराही जोमात आहे. त्यामध्ये आंतरमशागत पूर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी ज्वारी निसवत, तर हरभरा फुलोऱ्यावर आहे. 

बाजरीची पेरणी सुरूच आहे. लष्करी अळीचे संकट कमी झाल्याने मक्‍याची लागवड तापी व गिरणा काठावरील गावांमध्ये सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी डुकरांचा उपद्रव आणि लष्करी अळीचे संकटामुळे मका लागवड टाळली होती. परंतु चाऱ्याचा तुटवडा आहे. मक्‍याला दरही सध्या १५०० रुपयांवर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी मका लागवड सुरू केली आहे.

अळी दिसलेल्या भागात शेतकऱ्यांनी फवारण्या घेतल्या. दोन ते तीन फवारण्या काही शेतकऱ्यांनी केल्या. त्यात एकरी एका फवारणीसाठी किमान १५०० रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागला. परंतु अळी नियंत्रणात आली, असे शेतकरी गणेश पाटील (कठोरा, ता. जळगाव) म्हणाले. 

खानदेशात मका लागवड सुमारे ३० ते ३५ हजार हेक्‍टरपर्यंत जाऊ शकते. बाजरीची पेरणीही सुमारे १४ ते १५ हजार हेक्‍टरपर्यंत असू शकते. खानदेशात हरभऱ्याची एकूण ९० हजार हेक्‍टरवर, कोरडवाहू व बागायती ज्वारीची मिळून जवळपास ३५ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. सूर्यफूल आणि करडईची पेरणी झाली नसल्याची माहिती मिळाली.

कोरडवाहू ज्वारीची (दादर) पेरणी चोपडा व जळगाव तालुक्‍यात काळ्या कसदार जमिनीत आहे. परंतु पुरेसा ओलावा नसल्याने पिकात अपेक्षित निसवण नाही. हलक्‍या भागात पीक वाळू लागले आहे, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com