पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन उत्पादन

पाणी टंचाईमुळे रब्बी हंगामात जवळपास सव्वा लाख हेक्टरवर कांदा लागवड झाली. पोषक हवामानामुळे उत्पादनात बऱ्यापैकी वाढ झाली. विभागात सुमारे ३५ लाख टनांहून अधिक कांदा उत्पादन झाले आहे. - दिलीप झेंडे, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. पोषक हवामानामुळे अनेक ठिकाणी कांद्याच्या उत्पादनात चांगली वाढ झाल्याचे दिसून येते. पुणे विभागात रब्बी कांद्याचे जवळपास ३६ लाख ५२ हजार ९८० टन एवढे उत्पादन झाल्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. उत्पादित झालेल्या कांद्याची साठवणूक करून टप्याटप्याने विक्री केल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल.   

पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पीक बदल केला. बहुतांशी शेतकऱ्यांनी कमी पाण्याच्या पीकांवर भर दिला. रब्बी कांद्याच्या लागवड क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. पुणे विभागात रब्बी हंगामात एक लाख २१ हजार ७६६ हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. 

रब्बी कांदा तीन ते चार महिन्यांत काढणीस येत असून पाण्याचा ताण पडला तरी हातात काहीतरी प्रमाणात उत्पादन हाती येईल या उद्देशाने अनेक शेतकरी कांदा लागवडीकडे वळले होते. वर्षभरामध्ये शेतकरी खरीप, लेट खरीप, रब्बी (उन्हाळी) हंगामात कांद्याची लागवड करतात. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात नोव्हेबर, डिसेबरमध्ये कांद्याची लागवड केली होती. पाण्याचे योग्य नियोजन करून अनेक शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांना एकरी १० ते १५ टन तर सरासरी १२ टनापर्यंत उत्पादन मिळाले आहे. काही ठिकाणी पाणी टंचाईमुळे उत्पादनात घट झाली आहे, तर पाण्याची सुविधा असलेल्या ठिकाणी जास्त उत्पादन मिळाल्याचेही चित्र आहे. 

रब्बी हंगामातील कांद्याचे उत्पादन सुरू झाले आहे. त्यामुळे खरीप, लेट खरीप हंगामात उत्पादित झालेल्या कांद्याची विक्री करत आहे. बाजारात एकाच वेळी आवक वाढत असल्यामुळे कांद्याच्या दरावर परिणाम होत आहे. सध्या किरकोळ विक्रीच्या ठिकाणी कांद्याचा प्रति किलोचा दर १० ते २० या दरम्यान असला तरी मार्केटमध्ये हा दर अत्यंत कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा पिकांतून मोठा तोटा सहन करावा लागत आहे. 

पुणे विभागातील नगर जिल्हयात पारनेर, श्रीगोंदा, कोपरगाव, राहुरी, नेवासा, नगर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली होती. श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक ११ हजार ६०० हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यात सर्वाधिक १० हजार ७० हेक्टरवर लागवड झाली होती. शिरूर, खेड, बारामती, दौंड, आंबेगाव या तालुक्यातही बऱ्यापैकी कांदा लागवड झाली होती. सोलापूर जिल्हयातील बार्शी, मोहोळे, माढा या तालुक्यात बऱ्यापैकी कांदा लागवड झाली होती. करमाळा, पंढरपूर, सोगाला, मंगळवेढा, माळशिरस, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यात पाणीटंचाईमुळे कमी प्रमाणात लागवडी झाल्या होत्या.    

जिल्हानिहाय झालेली कांदा लागवड, (क्षेत्र हेक्टरमध्ये) व उत्पादन 
जिल्हा   झालेली लागवड झालेले उत्पादन (टनांमध्ये)
नगर  ७३,८९१ २२,१६,७३०
पुणे  ३८,७२५ ११,६१,७५०
सोलापूर ९१५०  २,७४,५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com