बुलडाण्याचा रब्बी हंगाम जाणार अडीच लाख हेक्टरपर्यंत

बुलडाण्याचा रब्बी हंगाम  जाणार अडीच लाख हेक्टरपर्यंत
बुलडाण्याचा रब्बी हंगाम जाणार अडीच लाख हेक्टरपर्यंत

बुलडाणा  ः  जिल्ह्याच्या रब्बी क्षेत्रात यावर्षी सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ अपेक्षित आहे. जिल्ह्यात यंदा २ लाख ४२ हजार ८१६ हेक्टरवर रब्बी लागवडीची शक्यता गृहीत धरीत कृषी खात्याने नियोजन केले आहे. खरिपातील नुकसानामुळे रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. वऱ्हाडातील सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात रब्बीत हरभरा, ज्वारी, मक्याची लागवड अधिक होत असते. मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकांचे नुकसान झालेच. शिवाय सोयाबीन काढणीचा हंगामही लांबलेला आहे. सततच्या पावसाने जमिनीत वाफसा तयार होण्यास वेळ लागत आहे. मूग, उडदाचे तयार झालेल्या शेतात रब्बी पेरणीचे काम शेतकऱ्यांनी हातात घेतले आहे.   कृषी खात्याने केलेल्या नियोजनानुसार हरभरा लागवड ही एक लाख १२ हजार हेक्टरवर होईल, असा अंदाज आहे. तर गव्हाची लागवड ६६५७५ हेक्टर, मका ३२००० तर रब्बी ज्वार १२५०० हेक्टरवर होईल, अशी शक्यता आहे. रब्बी हंगामाचा विचार केला तर या वेळी पाऊस, प्रकल्पांमधील साठा या सर्वच बाबी जुळून आलेल्या आहेत. गेल्यावर्षी जिल्ह्यात सर्वच प्रकल्पांची स्थिती जेमतेम होती. यावर्षी पावसाने सर्वत्र सरासरी तर ओलांडलीच शिवाय सर्वच प्रकल्प तुडुंब भरून आहेत. सध्या पाऊस उघडल्याने शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला लागला आहे. लागवडीसाठी अडचणी यावर्षी रब्बी लागवडीसाठी पैशांची सर्वात मोठी अडचण तयार झालेली आहे. खरिपात पिकवलेले सोयाबीन, ज्वारी, मका खराब झालेले असून कापूस पट्ट्यातही उत्पादकता कमालीची खालावण्याची चिन्हे आहेत. यामुळे रब्बीसाठी पैसा कसा उभा करावा हा पेच निर्माण झालेला आहे. पैशांची तजविज करताना शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.     मका लागवडीबाबत साशंकता कायम जिल्ह्यात रब्बी मक्याचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. मागील हंगामात रब्बीमध्येच मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यानंतर यंदाच्या खरिपातही या अळीने मक्याचे मोठे नुकसान केले. त्यामुळे आता रब्बीत मका लावायचा की नाही, याबाबत उत्पादक साशंकता व्यक्त करीत आहेत. मका लावला तर अळी येईल का, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.      रब्बीचे पीकनिहाय सरासरी क्षेत्र (हेक्टरमध्ये) ः रब्बी ज्वारी ११४४९, गहू ६६५०३, हरभरा ६१२४२, मका १७४५०, सूर्यफूल १७६, करडई ३१३, एकूण १५७१३३ पीकनिहाय यावर्षी प्रस्तावित केलेले क्षेत्र (हेक्टरमध्ये) ः रब्बी ज्वारी १२५००, गहू ६६५७५, हरभरा ११२५७५, मका ३२०००, सूर्यफूल १००, करडई १०००, मका चारा १८०००, एकूण २४२८१६   

हरभरा वाढीची शक्यता रब्बीचे पेरणी क्षेत्र भरपूर वाढेल. परंतु, अजून आठ ते दहा दिवस ओल कमी होण्याची शक्यता नाही. नोव्हेंबरच्या शेवटी पेरणी सुरू होईल. काही शेतकरी तुरीचे पीक मोडून हरभरा टाकतील. परंतु आज शेतकऱ्यांजवळ पेरणीसाठी पैसा नाही. खरिपाचा फटका रब्बीच्या लागवडीवर दिसून येत आहे.- प्रदीप देशमुख, शेतकरी, मेहकर, जि. बुलडाणा  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com