हिंगोली जिल्ह्यात पीक विम्याविना रब्बी हंगाम वाऱ्यावर

गतवर्षी कुटुंबातील तीन शेतकरी खातेदारांनी २२ एकर हरभरा पिकासाठी विमा संरक्षण घेतले. परंतु, यंदा विमा कंपनी नसल्यामुळे पीकविमा प्रस्ताव सादर करता आले नाहीत. - अशोक चव्हाण, तुळजापूरवाडी,(ता. वसमत), जि. हिंगोली.
Rabbi season without crop insurance in Hingoli district
Rabbi season without crop insurance in Hingoli district

हिंगोली : यंदा रब्बी हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली नाही. पर्यायी व्यवस्थादेखील नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा प्रस्ताव सादर करता आले नाहीत. परिणामी, जिल्ह्यातील शेतकरी रब्बीतील पिकांसाठी विमा संरक्षण घेऊ शकले नाहीत. त्यामुळे यंदा या पिकांना वाऱ्यावर सोडल्याचीच स्थिती आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत रब्बी हंगामातील पिकांसाठी पेरणी ते काढणीपर्यंतची उत्पादनातील घट, काढणीपश्चात झालेले नुकसान, प्रतिकूल हवामान घटक, गारपीट, भूस्खलन, आग, ढगफुटी, विजा कोसळल्यामुळे झालेली पीकहानी आदी बाबींसाठी नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण घेता येते. यंदा राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये रब्बी पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, हिंगोलीसह १० जिल्ह्यांसाठी निविदा प्राप्त न झाल्यामुळे कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. या जिल्ह्यांमध्ये पीकविमा योजना राबविण्यासाठी स्वतंत्र कार्यवाही केली जाईल, असे शासन निर्णयामध्ये नमूद आहे.

पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी मंगळवार (ता. ३१) पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती. या योजनेचे महत्त्व समजलेले अनेक जाणकार शेतकरी पीकविमा संरक्षण घेण्यासाठी इच्छुक होते. परंतु, विहित कालावधीमध्ये प्रस्ताव स्वीकारण्याच्या दृष्टीने कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. प्रस्तावांसाठी करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. जिल्ह्यात डिसेंबरअखेरपर्यंत १ लाख ५६ हजार ६३४ हेक्टरवर (१०४.७१ टक्के) पेरणी झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. येत्या काळात पिकांच्या काढणीपर्यंत गारपीट, अवकाळी पावसामुळे नुकसान होऊ शकते. त्यासाठी विम्याची गरज आहे.

मागील वर्षी ३ कोटी ३३ लाखांचा परतावा

जिल्ह्यात मागील वर्षी रब्बीत गहू, ज्वारी, हरभरा, करडई या रब्बी पिकांसोबत उन्हाळी हंगामातील भुईमूग या पिकांचा या योजनेत समावेश होता. ७७ हजार १५६ शेतकऱ्यांनी ५२ हजार १ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले. त्यासाठी १३ कोटी ४२ लाख रुपये विमा हप्ता भरला. गतवर्षी दुष्काळी स्थितीमुळे उत्पादनात मोठी घट आली. त्यामुळे १५ हजार ९०० नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३ कोटी ३३ लाख रुपये विमा परतावा मंजूर करण्यात आला होता.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com