जळगावमध्ये दोन लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणीचा अंदाज

रब्बी पेरणी तयारी सुरु
रब्बी पेरणी तयारी सुरु

जळगाव : जिल्ह्यात यंदा दोन लाख ११ हजार ८०० हेक्‍टरवर रब्बी पिकांची पेरणी होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्या दृष्टीने बियाण्यांची मागणी महाबीज व खासगी बियाणे उत्पादकांकडे करण्यात आली असून, खतांबाबतही जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नियोजन केले आहे.

यंदा पावसाची स्थिती अनियमित अशीच आहे; परंतु अद्याप पावसाळ्याचे काही दिवस बाकी आहेत. मागील वर्षी जेवढी लागवड रब्बी हंगामातील विविध पिकांची झाली होती, ती बाब लक्षात घेता क्षेत्र गृहीत धरून खते व बियाणे यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा जवळपास तीन ते चार हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बीची पेरणी होईल, असा अंदाज आहे. त्यात यंदा पाऊस कमी असल्याने अनेक शेतकरी कमी पाण्यात येणाऱ्या व शाश्‍वत उत्पादन देणाऱ्या हरभऱ्याकडे वळतील, असे चित्र आहे. गव्हाचे क्षेत्र मात्र नियोजित क्षेत्रापेक्षा कमी राहील.

रावेर, यावल, चोपडा, जळगावचा तापीकाठ व गिरणाकाठावर गव्हाची अधिक पेरणी होईल, अशी स्थिती आहे. यातच यंदा आतापासून कृषी पंपांना अनियमित वीजपुरवठा सुरू झाला आहे. भारनियमनही आहेच. त्यातही अधूनमधून रोहित्र जळणे, बिघाड होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे गव्हाचे सिंचन करताना अधिकचा त्रास होतो. ही बाब लक्षात घेता अनेक शेतकरी कुटुंबापुरताच गहू पिकविण्याचे नियोजन करताना दिसत आहेत.

तसेच ज्वारीची पेरणीही पारंपरिक पद्धतीने निर्धारित क्षेत्रात यंदा होईल. ज्वारीची पेरणी जळगावचा पूर्व आणि उत्तर भाग, चोपडा आणि अमळनेरचा तापीकाठ, यावल आदी ठिकाणी अधिक होईल; तर रावेरात मात्र ज्वारीचे क्षेत्र अपेक्षेएवढे राहणार नाही.

महाराष्ट्र बियाणे उत्पादक महामंडळ लि (महाबीज) यांच्यासह खासगी कंपन्यांकडे करण्यात आली आहे. जिल्ह्यात दादरच्या (रब्बी ज्वारी) बियाण्याची फारशी गरज नसते. अनेक शेतकरी आपल्या घरातील पारंपरिक वाणाची पेरणी करतात, अशी माहिती मिळाली.

रब्बीसाठी युरीयाची ९२ हजार, सिंगल सुपर फॉस्फेटची ४२ हजार, डीएपीची १३ हजार, पोटॅशची ३३ हजार; तसेच सुमारे ३० हजार टन संयुक्त खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. एकूण दोन लाख ३४ हजार टन विविध खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केली आहे. अद्याप त्यासंबंधीचा वितरण लक्ष्यांक मंजूर झालेला नाही. यंदा मागील वर्षातील रब्बी हंगामाचे क्षेत्र, वापरलेले खत यानुसार खते व बियाण्यांची मागणी महाबीजसह खाजगी कंपन्यांकडे करण्यात आली आहे. त्यानुसार पुरवठा होईल. खतांची कोणतीही अडचण यंदा भासणार नाही, याची काळजी घेतली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com