पुणे जिल्ह्यासाठी २९ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः पुणे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. हंगामात शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी स्तरावरून करण्यात आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडे २९ हजार ४०० क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बियाण्यांचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

जिल्ह्यातील अनेक भागांत पुरेसा पाऊस पडल्याने जमिनीत ओलाव्याचे प्रमाण चांगले आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर होणार असल्याने पेरणी क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होणार असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र तीन लाख ९७ हजार ५०५ हेक्टर आहे. चालू वर्षी कृषी विभागाने दोन लाख ९४ हजार ८५४ हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये रब्बी ज्वारीचे सर्वाधिक सुमारे एक लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापाठोपाठ गव्हाचे ४८ हजार, तर हरभऱ्याचे ४८ हजार १७० हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी २९ हजार ४०० क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांना तालुका, गावपातळीवरील कृषी सेवा केंद्रांमार्फत निविष्ठांचा पुरवठा केला जाणार आहे.  गेल्या वर्षी रब्बी हंगामात सुमारे १९ हजार ५७६ क्विंटल, २०१७ मध्ये सुमारे १८ हजार ५४६ क्विटंल तर २०१६ मध्ये १९ हजार ४४८ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. सरासरी १९ हजार १९० क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. गेल्या वर्षी दोन लाख ७२ हजार ४९६ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्याच धर्तीवर चालू वर्षीही कृषी विभागाने बियाण्यांचे नियोजन केले आहे. यंदा महाबीजमार्फत सुमारे ११ हजार ६५२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खासगी कंपन्यांकडून १३ हजार ४९८ क्विंटल, उर्वरित बियाण्यांचा पुरवठा राष्ट्रीय बीज निगमकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com